आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठापना:आज जल्लोषात 1598 मंडळे करणार गणरायांची प्रतिष्ठापना

टीम दिव्य मराठी | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा दीड हजार गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी परवाने घेतले आहेत. बीडमध्ये मानाच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका दुपारनंतर निघणार आहेत. अंबाजोगाई शहरात ६९, तर ग्रामीण भागात ९० ठिकाणी, तर माजलगाव शहरात जवळपास ६५ ठिकाणी गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे. केजमध्ये मानाची ५ गणेश मंडळे मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करणार असून बीड शहरातही मानाच्या ‘श्रीं’च्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.

बीड शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळ, आझाद हिंद गणेश मंडळ, ओझर गणेश मंडळ, नवरंग गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ, धांडेगल्ली गणेश मंडळ, हिंद तरूण गणेश मंडळ, ललकार गणेश मंडळ यांच्यासह वीरशैव गणेश मंडळांचे मानाचे गणपती आहेत.

या गणेश मंडळाकडून गणेश प्रतिष्ठापना व बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. अंबाजोगाई शहरात बुधवारी ६९, तर ग्रामीण भागात ९० गणेश मंडळाकडून ढोल-ताशांच्या गजरात गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शहरातील मंगळवार पेठ येथील नवयुवक गणेश मंडळाच्या गणपतीची मूर्ती १३ फूट उंचीची असल्याचे प्रकाश लखेरा यांनी सांगितले. तर खडकपुरा येथील हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाची गणेशमूर्ती ८ फूट उंचीची आहे. मल्हार गणेश मंडळ धनगर गल्ली, तरुण गणेश मंडळ कुत्तर विहीर, दीपक गणेश मंडळ गुरुवार पेठ, जय महाराष्ट्र गणेश मंडळ देशपांडे गल्ली ही गणेश मंडळे लाडक्या विघ्नहर्त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्याची माहिती हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनीलकाका लोमटे यांनी दिली.

माजलगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी ६५ गणेश मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ७० गणेश मंडळाला परवाने दिले आहेत. अधिकृत परवाने घेऊन गणेश मंडळाची स्थापना करावी, असे गणेश मंडळाला सूचित केले होते. माजलगावात गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. केज शहरात गुंड गल्लीतील महाराजा गणेश मंडळ, लोंढे गल्लीतील संगम गणेश मंडळ, हनुमान गल्ली गणेश मंडळ, माळी गल्लीतील त्रिमूर्ती गणेश मंडळ, गांधी चौकातील व्यापारी गणेश मंडळ हे पाच मानाचे गणपती आहेत.

दत्तात्रय मंडळाच्या ‘श्रीं’ची आज मिरवणूक
यंदा बीड शहरातील साळगल्लीतील श्री दत्तात्रय गणेश मंडळाचे यंदा ५० वे वर्ष आहे. अध्यक्ष गिरीश बागडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ असलेकर, सचिव गणेश शिंदे, विनोद फटाले, कोषाध्यक्ष कार्तिक अष्टेकर, संतोष धानुरे आहेत. या मंडळाच्या गणपतीची बुधवारी (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता शहरातील साठे चौकातून मिरवणूक निघेल.

बातम्या आणखी आहेत...