आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस; जिल्ह्यात 421 पैकी 180 प्रवेश निश्चित 241 प्रवेश बाकी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क कायद्यानुसार निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीसाठी आज ३ जून हा शेवटचा दिवस असणार आहे. या प्रवेशासाठी एक वेळा मुदतवाढ मिळालेली होती. दरम्यान, जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी निवड झालेल्या ४२१ पैकी १८० विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित झाले होते. २४१ प्रवेश होणे बाकी होते.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, विधवा, परित्यक्ता महिलांचे पाल्य यांना खासगी इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील काही वर्षांपासून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून व ऑनलाइन पद्धतीने राज्य स्तरावरच सोडत काढून प्रवेश याद्या निश्चित केल्या जातात.

जिल्ह्यात यंदा आरईटीनुसार प्रवेशपात्र असलेल्या २२७ शाळांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे नोंद करण्यात आलेली आहे. या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एकूण १ हजार ९०८ प्रवेशपात्र जागा आहेत. दरम्यान, यंदा जिल्ह्यातून या जागांसाठी मोठ्या प्रमाणावर पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. तब्बल ४ हजार ९५२ अर्ज ऑनलाइन पद्धतीने आले होते. यामधून पहिल्या फेरीत १ हजार ८३० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी सोडत पद्धतीने निवड करण्यात आली होती.

पहिल्या फेरीतील प्रवेशालाही दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर एकूण ११३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी जाहीर केली गेली होती. यामध्ये ४२१ विद्यार्थ्यांची निवड केली गेली होती. सुरुवातीला २७ मे हीच प्रवेशासाठीची मुदत होती, मात्र याला मुदतवाढ देऊन ३ जूनपर्यंत प्रतीक्षा फेरीतील प्रवेश करण्यास सांगितले गेले होते. दरम्यान, निवड झालेल्या ४२१ पैकी ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून २४१ विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केलेला नव्हता.

तर हुकेल संधी : दरम्यान, प्रतीक्षा यादीमधील प्रवेशाला यापूर्वीच एकदा मुदतवाढ मिळालेली असून ३ जूननंतर मुदतवाढ मिळणार की याबाबत गुरुवारी सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाला काेणत्याही स्पष्ट सूचना नव्हत्या. त्यामुळे मुदतवाढ मिळाली नाही तर निवड झालेले, मात्र प्रवेश निश्चित न केलेले विद्यार्थी प्रवेशाला मुकण्याचा धोका आहे.

प्रवेश निश्चितीसाठी करा संपर्क
जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी आज ३ जून ही अंतिम मुदत आहे. विद्यार्थी व पालकांनी सजग राहून प्रवेश निश्चित करावा, काही अडचण आल्यास शिक्षण विभागाशी संपर्क करावा असे आवाहन शिक्षण विभागाने व आरटीई कार्यकर्त्यांनी केले आहे.

तालुका समितीकडे प्रवेश : यंदा विद्यार्थ्यांना आधी शाळेत कच्चा प्रवेश व नंतर तालुका समितीकडे पक्का प्रवेश अशी दुहेरी चक्कर होणार नसून यंदा थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तालुकास्तरीय समितीकडेच प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्यांची प्रवेशासाठी निवड केलेली आहे त्यांना अर्ज करताना नोंदणी केलेल्या मोबाइलवर याबाबतचा संदेश पाठवलेला आहे असे शिक्षण विभागाकडून सांगितले गेले.

बातम्या आणखी आहेत...