आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:कोरोनाचे नियम पाळून बीड शहरात आज निघणार मराठा समाज आरक्षण क्रांती संघर्ष मोर्चा

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही जण समाजात दुफळी तयार करण्याचे काम करत असल्याची टीका

काही जण समाजात दुफळी तयार करण्याचे काम करत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. शनिवारी (५ जून) मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा हा कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून निघणारच, असा दावा आमदार विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केला आहे. आमदार मेटे म्हणाले, हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. हा लढा मराठा समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणातील सवलती आणि नोकरीसाठीच्या आरक्षणासाठी आहे. मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व. अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हेदेखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचे जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचेही योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचे काम सुरू केले. त्यांची ही सूडबुद्धी, आकस पूर्वीपासूनच आहे. काँग्रेस पक्ष येथे कुणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरू केला आहे. ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नाकारण्याचे काम केलं, त्यांनी पहिली हत्या अण्णासाहेब पाटील यांची घडवून आणली. त्यानंतरही अनेकांनी या लढ्यासाठी आपलं बलिदान दिलं हा इतिहास आहे. शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून हा मोर्चा निघून ताे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे आमदार मेटे यांनी सांगितले.

पोलिस सतर्क, तगडा बंदाेबस्त : सकाळी ११ वाजता निघणाऱ्या या मोर्चाच्या अनुषंगाने शुक्रवारपासूनच जिल्हा पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त लावला. ३ डीवायएसपी, पोलिस निरीक्षक, सपोनि, कर्मचारी, होमगार्ड, क्यूआरटी, एसआरपी, दंगल नियंत्रण पथक तैनात केले.

एसटीची सावधगिरी, बसेस हलवल्या
हा मोर्चा बसस्थानकाच्या जवळून जाणार आहे. सध्या, बस वाहतूक बंद असल्याने सर्व बसेस आगारातच उभ्या होत्या मात्र, मोठ्या संख्येने मोर्चा निघण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने बसेस विभागीय कार्यालयात हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका
काँग्रेसने आता तरी मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करत आहेत. त्यांना माझं खुलं आवाहन आहे की त्यांनी समोरासमोर येऊन खुला विरोध करावा. मराठा आरक्षणात काय चुकलं याची चव्हाण यांनी चर्चा करावी, मी त्यांच्या सगळ्या चुका सांगतो. मात्र आपलं मराठा आरक्षण न मिळाल्याचे आपलं पाप झाकण्यासाठी ते अशा कुणालाही पुढं करून बीडमध्ये पत्रकार परिषदा घेताहेत. मात्र, समाजाने अशा लोकांना किती महत्त्व द्यायचे हे ठरवून घ्यावे. माझी पुन्हा विनंती आहे की, समाजाचं भलं व्हावं यासाठी तरी प्रयत्न करा, असे आवाहन आमदार मेटे यांनी केले.

मोर्चा सुरू झाल्यानंतर वाहतुकीत बदल
मोर्चा सुरू झाल्यानंतर माेर्चाच्या मार्गावर असणारी वाहतूक बंद होणार आहे. नगर रोड आणि जालना रोडवरून शहरात वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. नगर रोडवरून येणारी वाहने कॅनॉल रोडवरून जालना रोडकडे वळवली जातील तर, जालना रोडवरून येणारी वाहने बायपासहून शहराबाहेर काढली जातील. शिवाय, शहरातही मोर्चा सुरू असेपर्यंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता बंद असेल.
आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भूमिका घेत आहोत. परंतु, मोर्चेकऱ्यांची प्रशासनाने अडवणूक करू नये. कोरोनामुळे मोर्चेकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कुणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आमदार मेटे यांनी दिला.

आरक्षण न मिळण्याला सरकारच कारणीभूत
जेव्हा जेव्हा न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडायची वेळ आली त्या वेळी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा हा लढा सुरू आहे. मराठा समाजाच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण झाल्या तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. असाच राज्यभरात त्या त्या ठिकाणचे लोक पुढाकार घेऊन मोर्चे काढतील. त्यामुळे एकटे विनायक मेटे हीरो होतील ही मानसिकता बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...