आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टूलकिट प्रकरण:आई म्हणते : तो पर्यावरणप्रेमी, प्लास्टिक बाटलीही वापरू देत नसे

बीड / अमोल मुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शंतनूने केले एअरोस्पेस विषयात मास्टर्स; दीड वर्ष अमेरिकेत नोकरी, नंतर औरंगाबादेतील कंपनीत केले काम

‘शंतनू शालेय जीवनापासून पर्यावरणप्रेमी आहे. घरच्यांनाही प्लास्टिकची बाटली वापरण्यापासून रोखत असे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा गुन्हा नाही. मीसुद्धा शेतकऱ्याची मुलगी आहे. माझाही आंदोलनाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया शंतनू मुळूकची आई हेमलता मुळूक यांनी दिली. शंतनूचा पर्यावरणाचा अभ्यास आहे. तो काही चुकीचे करणार नाही याचा मला विश्वास आहे, असे त्याचे वडील शिवलाल मुळूक “दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले.

दिल्लीचे शेतकरी आंदोलन जागतिक स्तरावर नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणामुळे बीडच्या शंतनू शिवलाल मुळूक या तरुणाविरोधात दिल्लीत गुन्हा नोंद आहे. शंतनूच्या शोधात दिल्ली पोलिस बीडमध्ये तळ ठोकून होते. “दिव्य मराठी’शी संवाद साधताना त्याच्या कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली. वडील शिवलाल म्हणाले, दिल्ली पोलिस शनिवारी पहाटे आमच्याकडे आले. त्यांनी शंतनूबाबत चौकशी केली. शंतनू लॉकडाऊनपासून ७ फेब्रुवारीपर्यंत बीडमध्येच होता. ७ फेब्रुवारीला नातेवाइकाच्या लग्नात तो सहभागी झाला. त्यानंतर मी बाहेरगावी जात आहे असे म्हणून जो गेला तो अद्याप परतलेला नाही. हे प्रकरण पोलिस घरी आल्यानंतरच आम्हाला कळले. शंतनू पर्यावरणप्रेमी आहे. झाडांची कत्तल होत असेल तर ती राेखली पाहिजे असे त्याला वाटे. आई हेमलता म्हणाल्या, प्लास्टिक नष्ट होत नाही, ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे हे सांगायचा. पाण्याची बाटलीही घेऊ देत नसे.

असा झाला शंतनूचा प्रवास : २००१ मध्ये तो बीडच्या शिवाजी विद्यालयातून दहावी झाला. २००४ मध्ये बारावी झाला. नंतर औरंगाबादच्या महाविद्यालयातून बीई मेकॅनिकल केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तीन वर्षे तो अमेरिकेत होता. एअरोस्पेस विषयात एमएस केले. अमेरिकेेच्याच एका विद्यापीठात दीड वर्ष नोकरीही केली. नंतर भारतात आला. औरंगाबादेतील कंपनीत तो नोकरीला होता.

शेतकरी आंदोलनात कसा आला
शंतनूच्या काही फेसबुक पोस्ट “दिव्य मराठी’च्या हाती लागल्या आहेत. यामध्ये तो सरकारच्या धोरणांबाबत सातत्याने बाेलत असल्याचे, त्याबाबतच्या पोस्ट शेअर करत असल्याचे दिसत आहे. शेतकरी आंदोलनाची १ फेब्रुवारी रोजी त्याने पोस्ट शेअर केलेली आहे. त्याआधीही २९ जानेवारी रोजीची पोस्ट आहे.

पुस्तक वाचनाचा छंद
वडील शिवलाल म्हणाले, त्याला वाचनाचा, अभ्यासाचा छंद आहे. त्याच्याकडे एअरोस्पेस विषयातील अनेक पुस्तके आहेत. पर्यावरणाशी संबंधित अनेक पुस्तके आहेत. तो कुठली एनजीओ चालवत नाही. मात्र मित्रांच्या एनजीओमध्ये काम करत असेल तर आम्हाला माहिती नाही.

बातम्या आणखी आहेत...