आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कनेक्शन:शेतकरी आंदोलनातील टूलकिटचे धागेदोरे थेट बीड, औरंगाबादपर्यंत! मूळ बीडच्या शंतनू मुळूकने तयार केले होते टूलकिट

बीड/ नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंतनू मुळूकचे बीड शहरातील चाणक्यपुरी भागातील घर. - Divya Marathi
शंतनू मुळूकचे बीड शहरातील चाणक्यपुरी भागातील घर.
  • शंतनूवर गुन्हा दाखल करून अजामीनपात्र वाॅरंटही जारी

शेतकरी आंदोलनातील वादग्रस्त टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील बीड व औरंगाबादशी जुळले आहेत. दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले की, हे टूलकिट दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू शिवलाल मुळूक यांनी एकत्रितरीत्या तयार केले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आले आहे. यातील शंतनू हा मूळ बीडचा असून तो फरार आहे. त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज केला आहे. शंतनूच्या शोधात दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री बीड गाठले. त्यांनी शंतनूच्या चाणक्यपुरी भागातील घरी जाऊन त्याचे वडील शिवलाल मुळूक व कुटुंबीयांची ३ तास चौकशी केली. यानंतर पथकाने शिवलाल यांना सोबत घेऊन औरंगाबादच्या घरी जाऊन आणखी चौकशी केली. परत त्यांना बीडमध्ये आणून सोडले.

आज खंडपीठात सुनावणी
औरंगाबाद | शंतनूच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी आहे. शंतनूच्या वतीने ॲड. सतेज जाधव बाजू मांडणार आहेत. शंतनूवर भादंवि १५३ अन्वये गुन्हा दाखल आहेत.

काय असते टूलकिट
जगभरात आंदोलनांत उतरलेले लोक ते पुढे चालवण्यासाठी धोरण आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करत असतात. हे मुद्दे ज्या दस्तऐवजात लिहिले जातात त्यांना टूलकिट असे म्हटले जाते. आंदोलनाचा प्रभाव व व्याप्ती वाढवण्यासाठी टूलकिट शेअर केले जाते. टूलकिटद्वारे आंदोलनात परस्परात ताळमेळ व नियोजन साधण्यात येते.

टूलकिटमधील महत्त्वपूर्ण बाबी
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या अपडेट टूलकिटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन केलेले हाते. फार्मर प्रोटेस्ट आणि स्टँड विथ फार्मर्स हॅशटॅग वापरण्यास सांगितले होते. भारत सरकारच्या प्रतिनिधींना फोन आणि ईमेल करून निदर्शने करण्यास सांगितले होतेे.

कोण आहे शंतनू : शंतनूचे प्राथमिक शिक्षण बीडमध्ये झाले. त्याने अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्याचे वडील शिवलाल हे बीडचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याला लहान भाऊ आहे. चुलत भाऊ सचिन मुळूक हे शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख आहेत. शंतनू हा पर्यावरणवादी आहे. इंजिनिअरिंगनंतर त्याने काही दिवस औरंगाबादेतील एका कंपनीत नोकरी केली. नंतर तो पुण्यात गेला. लॉकडाऊनपासून तो बीडमध्येच असतो, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

बँक खाती तपासली
दिल्ली पोलिसांनी शंतनू मुळूकच्या बीड आणि औरंगाबाद येथील बँक खात्यांची माहिती घेतली आहे. त्याच्या खात्यावर काही पैसे आले का, ते कुठून आले किंवा कुणाला पाठवले का या बाबी दिल्ली पोलिस तपासत आहेत.

मुलाची काळजी वाटते
शंतनूचे वडील शिवलाल म्हणाले, ‘तो सध्या बीडमध्ये नाही. तो कुठे आहे याची माहिती नाही. पोलिस घरी आल्यानंतरच या प्रकरणाची आम्हाला माहिती मिळाली. त्याची काळजी वाटते आहे. पोलिसांनी चौकशीत कुठला त्रास दिलेला नाही.’

जगभरात देशाची प्रतिमा मलिन करण्याचा कट : दिल्ली पोलिस
नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी सांगितले की, टूलकिटचे गुगल डॉक्युमेंट शंतनूने तयार केलेल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून बनवण्यात आले होते. अटकेतील दिशा रवीची चौकशी सुरू आहे. खलिस्तानी संघटनेशी संबंधित पोएटिक जस्टिस फाउंडेशनच्या मो. धालीवालने कॅनडात राहत असलेल्या पुनीतच्या माध्यमातून निकिता जेकबशी संपर्क साधला होता. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची झूम कॉलवर मीटिंग झाली. त्यात ट्विटरवर आंदोलनाशी संबंधित प्रक्षोभक हॅशटॅग्जला ट्रेंड करण्याबाबत चर्चा झाली. शेतकरी आंदोलन जागतिक स्तरावर पोहोचवून भारताची जागतिक प्रतिमा मलिन करण्याचा या लोकांचा कट होता, असा दावा दिल्ली पाेलिसांनी केला आहे.