आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ट्रॅव्हल्सचे भाव दुपटी-तिपटीने वाढले; प्रवाशांची लूट, 400 रुपयांचे तिकीट थेट दीड हजारावर पोहोचले

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लालपरी सुरू करावी, प्रवाशांची अपेक्षा

राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा संप खासगी वाहनधारकांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून एरवी चारशे रुपये तिकीट असणाऱ्या बीड ते पुणे ट्रॅव्हल्सचा दर आता थेट चारपट वाढून १६०० ते दोन हजार रुपये प्रति प्रवासी इथपर्यंत पोहोचला आहे.

या महागड्या दरामुळे प्रवासी भरडला जात असून याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना आरटीओचे. परिणामी ग्राहकांची अव्वाच्या सव्वा लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वात उपयुक्त सेवा म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. बीडहून पुण्यासाठी एसटी साडेचारशे रुपये तिकीट आकारते. मात्र, याच २५० किमी प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सचालक तब्बल एक ते दोन हजार रुपये प्रति सीट अशी आकारणी करत आहेत. रविवारी पाटोद्याहून पुण्याला जाण्यासाठी अमाल ट्रॅव्हल्स या कंपनीकडून तब्बल दीड हजार रुपये आकारले जात होते. दुसऱ्या बाजूला सागर ट्रॅव्हल्स, अजिम ट्रॅव्हल्स यासह इतर ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून तब्बल १२०० ते दीड हजार रुपयांची आकारणी केली जात आहे. बस बंद असल्याने प्रवाशांचा नाइलाज असल्याचा फायदा घेत हे ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त भाडे आकारत असून याकडे आरटीओसह प्रशासनाचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांची लूट सुरू असताना लोकप्रतिनिधीही डोळे झाकून दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे आरटीओ व प्रशासनही कानाडोळा करत असल्याने प्रवाशांतून संतापाची भावना व्यक्त होत असून लवकर एसटी बससेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवाशी करताहेत.

साडेतीनशे रुपये एसटी प्रवास भाडे असणाऱ्या पाटोदा ते पुणे या प्रवासासाठी ९०० ते दीड हजार रुपयांहून अधिक रुपये आकारले जात आहेत.

प्रवाशांची लूट थांबवण्यात यावी
एसटीची सेवा ही वेळेवर मिळते. शिवाय भाडेही अगदी रास्त असते. परंतु, एसटी बंद गेल्या काही काळात खासगी वाहतूकदारांनी आमची चांगलीच पिळवणूक सुरू केली आहे. याबाबत काहीतरी काही कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रवाशांची लूट अशीच सुरू राहील.’
- सचिन काळे, बीड

बातम्या आणखी आहेत...