आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बारावीचा निकाल 95.09 % शहरी भागात 6.77% विद्यार्थी फेल, ग्रामीणमध्ये 3.75%, 11 हजार 932 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणातूनच आपले मोठे व्हायचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, कुटुंबाची बिकट स्थिती बदलू शकते, ही यशाची उमेदच ‘त्यांची’ प्रेरणा बनली. पिंपळा येथील रामेश्वर खांडे, गढीची पल्लवी मिसाळ, बीडची दिशा सरवदे व माजलगावच्या श्रुती महाजनने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या स्वप्नांचा पाया रचणाऱ्या बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले. व्यक्तीगत पातळीवर संघर्ष करत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या प्रातिनिधिक उमेद कथा...
गेल्या पाच वर्षांतील जिल्ह्याचा निकाल 95.09
पल्लवी... मजूर वडील कष्ट उपसत असल्याच्या जाणिवेतून उच्चशिक्षित होण्यासाठी धडपड
जयभवानी महाविद्यालय, गढी येथील विद्यार्थिनी पल्लवी तुकाराम मिसाळ हिने बारावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. पल्लवीची घरची स्थिती अत्यंत साधारण असून वडील मजुरी करतात, तर आई शिपाई म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन आरोग्य सेवा देण्याचे तिचे स्वप्न असून पालकांचे कष्ट हेच प्रेरणा आहेत, असे ती सांगते.

श्रुतिका... कोरोनाने हिरावून घेतलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला जिद्दीने अभ्यास
माजलगावच्या सिद्धेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुतिका गणेश महाजन. वाणिज्य शाखेत ९१.१७ % गुण मिळाले. २०२० मध्ये कोविडकाळात श्रुतिकाच्या वडिलांचे, तर डिसेंबर २०२१ मध्ये आजीचे निधन झाले. वडिलांचे माझ्याविषयीचे जे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी रोज पहाटे साडेतीन वाजता उठून अभ्यासही सुरू ठेवला. आज त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले.

रामेश्वर... वडिलांचे हमालीचे काम, जाणिवेतून क्रीडा स्पर्धेत पदकासह बारावीच्या परीक्षेत शाळेतून अव्वल
बीडच्या सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी रामेश्वर खांडे. पिंपळा हे मूळ गाव असलेल्या रामेश्वरचे वडील हमाली करतात. पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत रामेश्वरने बारावीच्या परीक्षेत ९३.६७ % गुण प्राप्त केले. शासनाच्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतही रौप्यपदकही त्याने प्राप्त केलेले आहे. खेळाला वेळ देऊन त्याने अभ्यासातही यश मिळवत शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न तो बाळगून आहे.

दिशा...वडिलांच्या शिवणकामातून घरखर्च भागत नाही, त्यात आपला शिकवणीचा भार नको, मिळवले यश
बीडच्या स्वा. सावरकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा अशोक सरवदे. तिचे वडील शिवणकाम करत घरखर्च भागवतात. आई, गृहिणी आहेत, तर मोठ्या भावाचेही शिक्षण सुरू अाहे. कुठलीही शिकवणी न लावता केवळ स्वयंअध्ययनातून दिशाने बारावीच्या परीक्षेत ९१.५० टक्के गुण मिळवले. नीट परीक्षेचा तिचा सराव सुरू असून वैद्यकीय सेवेत नावलौकिक करण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आहे.

बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांची अशी असेल प्रवेश क्षमता?
जिल्ह्यात बारावीनंतर पुढील पदवी उच्च शिक्षण देणाऱ्या ११८ संस्था अाहेत. यासह व्यवसाय पदवी शिक्षण देणाऱ्या ७७ संस्था असून ९६४६ इतकी या ठिकाणची प्रवेश क्षमता आहे. यासह व्यवसाय पदविका शिक्षण संस्था ११ असून इथली प्रवेश क्षमता २५१४ आहे. यासह वैद्यकीय पदवी शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यात ८ संस्था असून इथे ५५० अशी प्रवेश क्षमता आहे.

यंदा १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या २१ ने वाढ
लीयंदा ३३ महाविद्यालयांचा बारावीचा निकाल १०० % लागला. शहरी भागातील १६, तर ग्रामीण भागातील १७ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालात यश मिळवले. २०१९ मध्ये ११ महाविद्यालयांचा निकाल १०० %, तर २०२० मध्ये १२ महाविद्यालयांचाच निकाल १०० % होता. यंदा १०० % निकाल लागणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढलीय.

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थिनींनी आष्टी शहरातील इंटरनेट कॅफेवर अशी गर्दी केली होती. छाया : शरद गर्जे
बीड तालुका पुढे, तर पाटोदा तालुक्याचा कमी निकाल प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा आम्हाला अभिमान म्हणून त्यांच्याच नावाचे हेडिंग रामेश्वर खांडे, पल्लवी मिसाळ, दिशा सरवदे, श्रुती महाजनची बाजी

बीड बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (८ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. सन २०२० च्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल ६.२६ टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्याने यंदा ९५.०९ टक्क्यांवर मजल मारली. शहरी भागातून १४ हजार ३१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ९६९ मुले अनुत्तीर्ण झाली, तर ग्रामीण भागातून २३ हजार १६६ मुलांपैकी ८६९ विद्यार्थी नापास झाले. म्हणजेच परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण शहरी भागात ६.७७ टक्के, तर ग्रामीण भागात हे प्रमाण केवळ ३. ७५ टक्के आहे.

गतवर्षी कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापनासह दहावी व अकरावीच्या गुणांआधारे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला होता. कोविडचे संकट कमी झाल्यानंतर मार्च २०२२ मध्ये जिल्ह्यातील ३७ हजार ४७६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ३५ हजार ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १ हजार ८३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २१ हजार २८३ विद्यार्थी तर १४ हजार ३५५ विद्यार्थिनींनी बारावीचा गड सर केला. जिल्ह्यात ९६.२२ टक्के असा सर्वाधिक निकाल एकट्या बीड तालुक्याचा असून सर्वात कमी निकाल ९३.२५ टक्के पाटोदा तालुक्याचा आहे. दरम्यान, बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निकालानंतर एकामेकांना पेढे भरवण्यात आले.

तालुकानिहाय निकाल
तालुका उत्तीर्ण निकाल विद्यार्थी
बीड ८३६३ ९६.२२ टक्के
पाटोदा २०४५ ९३.२५ टक्के
आष्टी ३९०४ ९३.३५ टक्के
गेवराई ३६५६ ९५.४८ टक्के
माजलगाव २५६८ ९४.०३ टक्के
अंबाजोगाई ३०७३ ९५.९६ टक्के
केज ४३८१ ९५.९० टक्के
परळी ३६९४ ९४.४० टक्के
धारूर ६८३ ९४.२० टक्के
शिरूर १७२५ ९४.९३ टक्के
वडवणी १५४७ ९५.१४ टक्के
एकूण ३५६६८ ९५.०९ टक्के

बातम्या आणखी आहेत...