आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुठल्याही अनुदानित शाळेला प्रवेश फी घेण्याचे अधिकार नाहीत. प्रवेशासाठी विद्यालयाएेवजी संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या मंगल कार्यालयात पालकाकडून पैसे घेणाऱ्या येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या २ शिक्षकांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी व पोलिस यांना बरोबर घेऊन केलेल्या झडतीत हा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, २ शिक्षकांकडून प्रवेश अर्जांसह पालकांकडून वसूल केलेली रोख पावणेदोन लाखाची रक्कम जप्त केली असून पोलिसांनी १५ पालकांचे जबाब नोंदवले.
सिद्धेश्वर विद्यालयाकडून शाळा प्रवेशासाठी पालकाकडून पैसे घेतले जात असल्याने प्रहार संघटनेचे गोपाल पैंजणे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. परंतु, यावर काहीच कारवाई झाली नसल्याने त्यांनी आमदार सोळंके यांना हा प्रकार सांगितला. आमदार सोळंकेंनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णींना बैठकीसाठी माजलगाव येथील विश्रामगृहावर बोलावून घेतले होते.
सिद्धेश्वर विद्यालयाचे शिक्षक शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडून पैसे घेत असल्याची माहिती मिळताच आमदार सोळंकेंनी शिक्षणाधिकारी कुलकर्णी, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांना बरोबर घेऊन वैष्णवी मंगल कार्यालय गाठले. त्यानंतर इथे केलेल्या झाडाझडतीत शिक्षक सदाशिव ढगे, परमेश्वर आदमाने यांना पालकांकडून प्रवेशासाठी पैसे घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १ लाख ७६ हजारांसह प्रवेश फॉर्म ताब्यात घेतले. आमदार सोळंके यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोरच दोन शिक्षकांना फैलावर घेतले तेव्हा दोन्ही शिक्षकांनी आम्ही नोकरीचे ताबेदार असून आम्हाला मुख्याध्यापक बाबूराव आडे व कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी या ठिकाणी बसवल्याचे सांगितले.
अनुदानित शाळेला प्रवेश फी घेण्याचा कोणताही अधिकार नाही
मंगळवारच्या झाडाझडतीत ३० प्रवेश फॉर्म आढळून आलेत. ही शाळा १०० टक्के अनुदानित असल्याने विद्यार्थ्यांचे विनामूल्य प्रवेश होणार असून पालकांचे पैसेदेखील परत मिळतील. कुठल्याही अनुदानित शाळेला प्रवेश फी घेण्याचे अधिकार नाही. कोणीही प्रवेशासाठी पैसे देऊ नयेत. -श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, बीड
तक्रारी असल्याने लढवली संस्थाचालकांची शक्कल
सिद्धेश्वर विद्यालयाबाबत तक्रारी असल्याने संस्थाचालकांनी अनोखी शक्कल लढवत शाळेचा पदाधिकारी असलेल्या जगदीश साखरे यांच्या वैष्णवी मंगल कार्यालयात पैसे घेऊन शालेय प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. पालकांमुळे हे बिंग फुटले.
पोलिसांनी पंधरा पालकांचे जबाब घेतले नोंदवून
याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या १५ पालकांचे पोलिसांनी जबाब नोंदवले.
प्रवेशासाठी अशी घेतली जात होती रक्कम?
वर्ग प्रवेश फी
पहिली ५०००
दुसरी ५०००
तिसरी ५०००
चौथी ५०००
पाचवी ११०००
सहावी ते दहावी १५०००
बीड
जिल्ह्यातील खासगी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा दरवर्षी मनमानी फी वाढवत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. नवीन २०१९ च्या सुधारणा कायद्यानुसार शाळांमधील शुल्कवाढीसंदर्भात कायदा केला. परंतु, अनेक खासगी शाळा त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे शासनाने पालकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने केली आहे.
याबाबत विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने यांनी म्हटले की, नुकतेच माजलगाव येथे श्री सिद्धेश्वर प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक वैष्णवी मंगल कार्यालयात पालकांकडून पैसे घेत असताना रंगेहाथ पकडले. मोठमोठ्या इमारती बांधून उच्च व दर्जेदार शिक्षणाचे आमिष दाखवून पालकांकडून पैसे उकळण्याचे काम या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून होत आहे. शिक्षण विभागाचे या खासगी शाळांवर नियंत्रण न राहिल्यामुळे अशा शाळांचा मनमानी कारभार चालू आहे. याविरोधात शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी आवाज उठवणार असल्याचा इशारा शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.