आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. एकीकडे हवामानाचा पार घसरत असताना गावातील राजकीय वातारण मात्र गरम होत आहे. जिल्ह्यात गावकार हाती घेऊन सरपंच होण्यासाठी १ हजार ९३२ जण तर, सदस्य होण्यासाठी १२ हजार २१९ जण रिंगणात आहेत. दुसरीकडे, थेट जनतेतून निवडणूक असूनही ४७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आले तर, ६६२ सदस्य बिनविरोध निवडले गेले. दरम्यान, आकडेवारीनुसार, सरपंच आणि सदस्यांच्या जागेसाठी सरळ लढतीचे चित्र आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका सध्या सुरु आहेत. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अर्ज स्विकृती झाली. सुरुवातीला ऑनलाइन असलेले अर्ज आणि धिमे संकेतस्थळ यामुळे उमेदवारांची चिंता वाढली होती मात्र, अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्जासाठी मुभा दिल्याने अखेरच्या क्षणी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ५ हजार ७४७ जागांसाठी तब्बल २४ हजार अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, अर्ज छाननीनंतर ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचपदाच्या शर्यतीतून २ हजार १४७ तर, सदस्यपदाच्या शर्यतीतून ६ हजार ५२१ जणांनी माघार घेतली यातील अनेक डमी अर्ज होते. जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध निघाल्या आहेत. १४० ग्रामपंचायती या अंशत: बिनविरोध निघाल्या आहेत. यामध्ये कुठे सरपंच तर कुठे काही सदस्य बिनविरोध आहेत. ६७० ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
असे निघाले बिनविरोध सरपंच व सदस्य : बीड तालुक्यात १३२ पैकी १४ सरपंच १४४ सदस्य बिनविरोध निघाले तर, गेवराईत ७६ पैकी १ सरपंच आणि ३५ सदस्य निवडले गेले. शिरुरमध्ये २४ ग्रा.पं. मध्ये २१ सदस्य बिनविरोध झाले. आष्टीत १०९ पैकी ४ सरपंच आणि ९९ सदस्य, पाटोद्यात ३४ ग्रा.पं.मध्ये ६ सरपंच, ७७ सदस्य निवडले गेले. माजलगावात ४४ ग्रा.पं.मध्ये ४ सरपंच, ४३ सदस्य निवडले गेले. धारुला ३१ पैकी ३ सरपंच, ४५ सदस्य अविरोध झाले. वडवणीत २५ ग्रा.पंत १७ सदस्य बिनविरोध झाले. परळीत ८० पैकी ६ सरपंच तर ७९ सदस्य बिनविरोध झाले. अंबाजोगाईत ८३ पैकी ५ सरपंच, ६५ सदस्य बिनविरोध झाले. केजमध्ये ४ सरपंच, ३७ सदस्य बिनविरोध झाले.
प्रचाराची रणधुमाळी झाली सुरु
७ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित होते मात्र, ही प्रकिया रात्री उशीरापर्यंत चालली त्यामुळे ८ डिसेंबर रोजी तरी चित्र स्पष्ट होईल अशी आशा होती मात्र तहसिलने जिल्हाधिकारी कार्यालयाला उशीरा माहिती दिली, त्यात अनेकांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे तीन दिवस आकडेमाड करुन ९ डिसेंबर रोजी लढतींचे चित्र स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.