आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पुन्हा संकटात:उसाला फुटले तुरे; तीन कारखाने असूनही शेतकऱ्यांवर ऊस बांधावर टाकण्याची वेळ

दिंद्रुड7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’दिंद्रुड शिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उडाल्या झोपा

दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिल्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे परिसरातील उसाचे क्षेत्र वाढले असून यंदाचा ऊस तोडणीला आला आहे. कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी दिलेल्या तारखा संपून गेल्या तरी देखील वेळेत ऊस तोडणी होत नसल्यामुळे तुरे फुटलेला उभा ऊस शेतात वाळू लागला आहे. दिंद्रुड परिसरातील ही स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत असून ऊस बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.

माजलगाव व धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक झाले आहे. मात्र तीन साखर कारखाने मतदारसंघात असताना शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी वेळेत जात नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. ऊस तोडणीची तारीख होऊन गेल्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी उसाला पाणी देणे बंद केलेले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तुरे फुटून उभा ऊस वाळून जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस हा सोळा-सतरा महिने होऊन देखील वाढत असताना कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. वेळेत कारखान्याला ऊस जात नसल्यामुळे, शेतकऱ्यांचे बेहाल झाले असून, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ दिल्यागत ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. कारखानदारांनी जास्तीची यंत्रणा राबवून ऊस घेऊन जाण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना नाही कोणी वाली
माजलगाव मतदारसंघात तीन साखर कारखाने असल्याने कारखाना कार्यक्षेत्रात बऱ्यापैकी उसाचे क्षेत्र असते. सध्या बाहेरील ऊस आणला जातो. मात्र, दिंद्रुड व परिसरात शेतात उभा ऊस तुरे फुटलेल्या अवस्थेत असून उसाचे वजन घटत चालले आहे. अशातही प्रशासन आणि कारखानदारांनी या विषयाला गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याचे दिसून येतेय.

बातम्या आणखी आहेत...