आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर खळबळ:मोदींनी कौतुक केलेल्या बीडच्या तरुणास उत्तर प्रदेश धर्मांतर रॅकेट प्रकरणात अटक, बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावचा रहिवासी इरफान

धनंजय आढाव/अनिल देशमुख | परळी वैजनाथ (जि.बीड)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर रॅकेटप्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) गावचा तरुण इरफान खान ख्वाजा खान पठाण याला सोमवारी उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्लीत अटक केली. इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ज्ञ म्हणून काम करतो. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे सांकेतिक भाषेत उत्तम रूपांतर केल्याबद्दल इरफानला शाबासकी देऊन मोदींनी त्याचे कौतुक केले होते. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, इरफानच्या अटकेेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून त्याला या प्रकरणात विनाकारण गोवले असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर, बनारस आणि नोएडा भागातील मूकबधिर मुले, तरुणी, महिलांना फूस लावून त्यांचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली २२ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) मुफ्ती जहाँगीर आलम कासमी आणि मोहंमद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी दिल्लीत अब्दुल मन्नान ऊर्फ मन्नू राजीव यादव, (रा.गुरुग्राम, हरियाणा), इरफान ख्वाजा पठाण (सिरसाळा, ता.परळी, जि.बीड)आणि राहुल प्रवीण भोला ( रा.उत्तमनगर, नवी दिल्ली ) या तीन जणांना अटक केली. धर्मांतर रॅकेटची देशभरात चर्चा सुरू असतानाच सोमवारी इरफान पठाणला अटक केल्यामुळे खळबळ उडाली.

बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावचा रहिवासी इरफान खान पठाण, केंद्रीय महिला-बालकल्याण विभागात मूक-बधीर भाषा तज्ज्ञ
तीन भावंडांत इरफान धाकटा

इरफान हा चार वर्षांपासून दिल्ली येथील केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाशी संबंधित विभागात मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेचा तज्ज्ञ म्हणून काम करतो. धर्मांतर प्रकरणात इरफानला अटक झाल्यामुळे सिरसाळा गावातील त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. सिरसाळा गावातील जायकवाडी वसाहतीत त्याचे घर आहे. खान कुटुंबात मोठा भाऊ फुरखान, दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ इम्रान व सर्वात छोटा भाऊ इरफान पठाण आहे. इरफानचे वडील ख्वाजा खान पठाण हे एसटी महामंडळात मेकॅनिक होते.

काय आहे नेमके प्रकरण
गेल्या आठवड्यात २२ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) दिल्लीच्या जामियानगर भागातून मुफ्ती जहाँगीर आलम कासमी आणि मोहंमद उमर गौतम या दोन जणांना अटक केली होती. इस्लामिक दवा सेंटरच्या नावाखाली गरीब, मूकबधिर, मुले,तरुणांना पैसे, नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून कासमी आणि उमर गौतम हे धर्मांतर करायचे. आतापर्यंत त्यांनी जवळपास १ हजार लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली उमर गौतम याने दिली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.

आयएसआयकडून पैसा, ईडीने सुरू केला तपास
मूकबधिर विद्यार्थी, गरीब महिला आणि नागरिकांचे बेकायदा धर्मांतर करण्याच्या या रॅकेटमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचाही हात असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने प्राथमिक अहवाल नोंदवून तपास बेकायदा व्यवहार कायद्यानुसार कायद्यानुसार तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या काही मालमत्ताही जप्त करण्याचे अधिकार ईडीला आहेत.

आतापर्यंत १००० लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली
हे रॅकेट चालवणारे दोन जण असून त्यापैकी उमर गौतम याने आतापर्यंत १ हजार लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली उत्तर प्रदेश पोलिसांना दिली आहे. पैसे, नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून नोएडा, कानपूर, वाराणसी येथील गरीब तसेच मूकबधिर मुले, महिलांचे बेकायदा धर्मांतर करण्यात आले, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले.

मूकबधिर मुलांचे धर्मंातर केल्याचा ठपका : इरफान हा सांकेतिक भाषेत पारंगत आहे. दुभाषा म्हणून काम करता-करता इरफान याने मूकबधिर मुलांना आमिष दाखवून त्यांचे बेकायदा धर्मांतर केल्याचा ठपका उत्तर प्रदेश पोलिसांनी ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...