आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ:3 किमी पायी चालत धडकला माेर्चा, शिरूरमध्ये आंदोलन, हजारो मराठा समाजबांधवांचा सहभाग

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील घटनात्मक आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील महामोर्चा बीड जिल्ह्यातील शिरूर तहसीलवर सोमवारी काढण्यात आला. महामोर्चासाठी महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातून हजारो मराठा समाजबांधव शिरूरमध्ये एकत्र आले होते. एका तासात तीन किलोमीटरचे अंतर पायी चालत मोर्चेकऱ्यांनी शिरूर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देत पुन्हा एकदा वज्रमूठ आवळली.

सिद्धेश्वर मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील छत्रपती संभाजी चौकामध्ये प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा महामोर्चा शहरातील प्रमुख बाजारपेठ रस्त्याने राष्ट्रमाता जिजाऊ चौकात आला. नंतर महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात विद्यार्थिनींची भाषणे झाली. यानंतर तहसीलदार श्रीराम बेंडे यांना समाजाच्या मागणीचे निवेदन दिले. त्यांनतर राष्ट्रगीताने सांगता झाली. या मोर्चामध्ये शाळकरी मुले, महिला, युवक व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. एकच मिशन मराठा आरक्षण, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी शिरूर शहर दणाणून गेले होते. शिरूर शहरात येणारे प्रमुख रस्ते बंद करून सोयीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रमाता जिजाऊंची वेशभूषा करून विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी अपर अधीक्षक ते उपनिरीक्षक एकूण २५ अधिकारी, १५० अंमलदार, विशेष सुरक्षा रक्षकाच्या चार तुकड्या, मुख्य संयोजकांची २५ जणांची टीम व ३५० स्वयंसेवकाची फौज मोर्चाच्या बंदोबस्तासाठी होती.

नांदेडवरून सायकलवर आले बाळासाहेब शिरूरच्या महामोर्चाला नांदेड ते शिरूर असे २६० किलोमीटरचे अंतर सायकलवर कापत बाळासाहेब इंगळे पाटील शिरूरमध्ये आले होते. महामोर्चामध्ये सायकल घेऊनच ते चालत होते. उस्मानाबाद, अहमदनगर, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते.

राज्यात आतापर्यंत निघाले ५८ मूक मोर्चे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाने आतापर्यंत राज्यात ५८ भव्य स्वरूपाचे मूक मोर्चे काढले. यामध्ये समाजाकडून शिस्त, संयम व स्वच्छतेचे पालन केले होते. शिरूर येथील मराठा आरक्षण महामोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाजाने शिस्त, संयम व स्वच्छतेचा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...