आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • Various Activities In The Schools Of The District At The Beginning Of The Academic Session; Prabhatpheri, Distribution Of Books And Felicitation Of Students And Parents |marathi News

शाळा गजबजल्या:शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी जिल्ह्यातील शाळांत विविध उपक्रम; प्रभातफेरी, पुस्तके वाटपासह विद्यार्थी-पालकांचा सत्कार

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ला बुधवारी (ता.१६ जून) सुरुवात झाली असून जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव पार पडला. यानिमित्त शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालक, ठिकठिकाणचे ग्रामस्थ यांनीही प्रवेशोत्सवात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बीड शहरातील पूरग्रस्त कॉलनी येथील प्रभातकार विद्यालयात पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचे शालेय परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरात फेरी काढून स्वागत करण्यात आले. संस्थेचे संचालक इगडे व मुळे यांच्या हस्ते मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच सर्व शिक्षकांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक परदेशी व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. प्रभाकर शिक्षण संस्थेचे सचिव एस.आर. कोरे यांनी शाळेस भेट देऊन सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

केएसपी विद्यालय, बीड
बीड शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालयात अंजली शेळके, गटशिक्षणाधिकारी ऋषीकेश शेळके, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचे स्वागत करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना फुले, चॉकलेट आणि पुस्तके देण्यात आले. यावेळी शेळके म्हणाल्या की, शाळा म्हणजे विद्यामंदिर आणि या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा राष्ट्राचा जबाबदार व्यक्ती असतो. म्हणून आम्ही दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच या शाळेमधून देशस्तरावर कार्य करणारे विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करु. याप्रसंगी कर्मचारी हजर होते.

योगेश्वरी नूतन विद्यालय
शालेय विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून उच्चशिक्षित व्हावे. माहिती आणि तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. शालेय अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या यशाचा मुळ पाया आहे, असे प्रतिपादन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज चौक शाखेचे व्यवस्थापक सिद्धार्थ ठाणे यांनी केले. येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात पहील्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे, उपमुख्याध्यापिका अपर्णा पाठक, ज्येष्ठ पर्यवेक्षक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रा. माणिकराव लोमटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सुर्डिथोट जि.प.शाळा, बीड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्डिथोट येथील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या समोर रांगोळी काढून, वर्गात फुगे व फुले लावून सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना बोलवून गावामध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.

जयभवानी विद्यालय, गढी
गढी येथील जयभवानी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य वसंतराव राठोड, सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत घोंगडे, अमोल ससाने, गहिनीनाथ उगलमुगले, गहिनीनाथ कदम, उपप्राचार्य आर.एस. सानप, पर्यवेक्षक के.एन. गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन आणि पुस्तकांचा संच मोफत वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीत बडे यांनी केले. आभार प्रदर्शन रामदास शिंदे यांनी मानले.

सरस्वती विद्यामंदिर, बीड
बीड येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी संस्थेचे सचिव व शिक्षक नेते उत्तम पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासह शिक्षकांनाही प्रोत्साहन दिले. गेल्या दोन वर्षातील शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी शिक्षकांनी वेळप्रसंगी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी शिक्षकांना केली.

बातम्या आणखी आहेत...