आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘१ मे २०१० रोजी माझे पती तुकाराम राख शहीद झाले. जम्मूमध्ये नौशेरा भागात ते रात्रगस्तीवर होते. दुर्गम भागात असताना हिमस्सखल होऊन दरीत कोसळले व वीरगतीला प्राप्त झाले. ज्या ठिकाणी ते शहीद झाले त्या ठिकाणी आयुष्यात कधीतरी नतमस्तक होण्याची इच्छा होती. सैन्याच्या ५६ आरआर युनिटने ही इच्छा पूर्ण केली. ज्या ठिकाणी जवान शहीद झाले. त्या भूमीवरील माती आम्हाला सैन्याने भेट दिली. ही भेट अविस्मरणीय आहे.’ वीरपत्नी भाग्यश्री राख सांगत होत्या..
सैन्यात कार्यरत असताना शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आपला मुलगा, पती, वडील शहीद झाले ते ठिकाण पाहता यावे यासाठी सैन्याच्या ५६ आर.आर. युनिटने पुढाकार घेत शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना पर्यटन घडावे, सैन्यदलाशी त्यांचे ऋणानुबंध कायम राहावेत, हा या सहलीचा उद्देश होता. देशातील एकूण १४ जवांनाच्या कुटुंबीयांना ही सहल घडवली गेली यात महाराष्ट्रातील १० वीरपत्नी, वीरमाता व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. वीरपत्नी भाग्यश्री राख म्हणाल्या, कुणाचे वडील, कुणाचा मुलगा तर कुणाचा पती देशसेवा करताना शहीद झाला. मी कधीही माझ्या पतीसोबत त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊ शकले नव्हते, तसे अनेक कुटुंबीयही जाऊ शकले नव्हते. मात्र, जेथे देशासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तीने प्राण दिले ते ठिकाण सर्वांनाच पाहायचे असते. मात्र, ती संधी मिळत नाही. सैन्याच्या ५६ आर. आर. युनिटनेच प्रणव पवार, चंद्रकांत पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे ही बाब शक्य झाली.
अन् अश्रू अनावर...
जवान ड्यूटी करतात तो परिसर किती खडतर आहे, बर्फाळ दऱ्या, डोंगरांचा हा परिसर धोकादायक आहे. इतक्या कठीण स्थितीत आपले जवान कर्तव्यनिष्ठता व देशाप्रतीचे प्रेम दाखवत शत्रूला रोखून धरतात. प्रत्येक जवान कोणत्या भागात व कसा शहीद झाला हे दाखवले जात होते. त्याची माहिती देताना शहिदांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
पर्यटनही घडवले
सैन्यदलाने कुटुंबीयांना दल सरोवर, बॉटनिकल गार्डनसह इतर ठिकाणे दाखवली. या सहलीने कुटुंबीयही भारावले. जवान सीमेवर कशा प्रकारे एकत्रित राहून प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होतात, हेही पाहून प्रत्येकाला समाधनही वाटले.
सन्मानार्थ आयोजन
शहीद जवांनाचे स्फूर्तिस्थळही तेथे उभारले गेले असून प्रत्येक शहीद जवानाचे नाव तेथे आहे. शहिदांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ सैन्याकडून कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. प्रत्येकाचा सन्मान केला गेला, असे भाग्यश्री यांनी सांगितले.
या शहिदांच्या कुटुंबीयांचा समावेश : शहीद जवान संदीप इंगळे (कोल्हापूर), बालाजी अंबोरे (परभणी), तुकाराम राख (बीड), महेश धायगुडे (सातारा), रामचंद्र माने (मिरज), गणेश ढवळे (सातारा), सांडू दांडगे (औरंगाबाद), नीलेश शिंदे (सातारा) दीपक पवार व अन्य शहिदांच्या कुटुंबीयांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.