आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुक:गावात दिग्गज झीरो..नवखे हीरो...

टीम दिव्य मराठी| बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राजकीय सत्तांतर आणि घडामोडीनंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७०४ ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया राबवली गेली. यात मतदारांनी अनेक प्रस्थापितांना जमीन दाखवून नवख्यांच्या हाती सत्तेची दोरी दिली. ग्रामीण भागाच्या या निवडणुकीतून आगामी निवडणुकांचे आडाखे बांधले जाणार आहेत. माजलगाव बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ यांचाही गावात पराभव झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत गावकीच्या राजकारणात राज्य आणि जिल्हा पातळीवर राजकारण करणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी धक्के दिले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना राजूरी या त्यांच्या मूळ गावात पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडून धोबीपछाड मिळाला. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणेंची मुलीचा पराभव झाला. गंगाखेडचे रासपचे आ. रत्नाकर गुट्टेंच्या गावात राष्ट्रवादीची रसशी झाली तर, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. आष्टी माजी जि. प. अध्यक सविता गोल्हार यांचे पती विजय गोल्हार यांचा गावातच पराभव झाला. दरम्यान, ग्रामपंचायतींचे हे निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेसाठी नेत्यांना अलर्ट करणारे आहेत.

जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ७०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली होती. राज्यात ही सर्वात जास्त संख्या होती. थेट नगारिकांमधून सरपंच निवड असूनही ४७ ठिकाणी सरपंच बिनविरोध िनवडले गेले होते तर, ६६३ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले होते. दरम्यान, ६७१ ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली गेली होती. जिल्ह्यात ८३ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी मतमाेजणी झाली.

राजूरी (ता.बीड) ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांच्या पॅनलमध्ये लढत होती. दोघांनीही ही लढत प्रतिष्ठेची केली होती. यात, आ. संदीप यांच्या गटाच्या मंजुषा सुनील बनकर यांचा विजय झाला. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या केज तालुक्यातील आनंदगावमध्ये काँग्रेसच्या पॅनलबरोबर लढत होती. यात त्यांची मुलगी हर्षदा सोनवेणचा पराभव झाला. हर्षदाचा यापूर्वी नगर पंचायत निवडणूकीतही पराभव झाला होता. दुसऱ्यांदा सोनवणेंना मुलींच्या पदासाठी धक्का बसला आहे. इथे प्रणिता संतोष सोनवणे या विजयी झाल्या. मुंबई बाजार समितीचे सभापती असलेल्या अशोक डक यांच्या माजलगाव तालुक्यातील सोन्नथडी गावात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. तर, माजलगाव बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांचाही गावात पराभव झाला.

राज्यात सर्वाधिक ग्रापं.त रणधुमाळी
आनंदगावात राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या मुलीचा पराभव
कन्हेरवाडीत रासपाचा पॅनल विजयी
मुंबई बाजार समितीच्या सभापतींची गावातच हार
गंगाखेडचे आ. गुट्टेंच्या गावात राष्ट्रवादीची सरशी
गेवराईत भाजपचा धुव्वा, राष्ट्रवादीची सरशी
अाष्टीत माजी जि. प. अध्यक्षांच्या पतीचा पराभव

वडवणीत बरोबरीत सामना
वडवणी तालुक्यात १५ महिला सरपंच असून भाजप ५, राष्ट्रवादी ५, सेना (ठाकरे) १, सेना (शिंदे) १, मविआ युती ४, आंधळे गट १ असा पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

माजलगावमध्ये भाजपचा दावा
माजलगाव तालुक्यात २६ महिला सरपंच आल्या असून एकूण ग्रामपंचायतींपैकी भाजपने २० ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादी १५, शिवसेना (ठाकरे )१, इतर ८ असे संख्याबळ आहे.

धारुरमध्ये राष्ट्रवादीच्या १९ ग्रामपंचायती
धारुर तालुक्यात १४ महिला सरपंच विजयी झाल्या. २८ पैकी राष्ट्रवादी १९, बीजेपी ८, युवक काँग्रेस १ अशा एकूण ग्रामपंचायती निवडूण आल्या आहेत. ़

गेवराईत अमरसिंहांचा बोलबाला कायम
गेवराई तालुक्यात ३८ महिला सरपंच विजयी झाल्या आहेत. शिवाय, एकूण निकालात पक्षीय स्थिती राष्ट्रवादी ४८, शिवसेना (ठाकरे) ११, भाजप ११, भाजप-सेना युती : २, अपक्ष ४ अशी आहे.

चर्चेतील गावांचा निकाल
राजुरी : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांच्या पॅनलमध्ये लढत होती. आ. संदीप यांच्या गटाच्या मंजुषा बनकर यांचा विजय झाला.
नाथ्रा : ग्रा.पंवर अजय मुंडे यांचा विजय, त्याने वंचित बहुजनच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

शिराळ : अष्टीतील शिराळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब अाजबे यांचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या पॅनलचा त्यांच्या पॅनलने पराभव केला.
दैठण : गेवराई तालुक्यातील दैठण येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन मंत्री संदिपान भुमरेंच्या कन्या प्रणिता पंडीत राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या.

बावी : आष्टी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीत भाजपच्या माजी झेडपी अध्यक्षा सविता गेल्हार यांचे पती विजय गोल्हार यांचा शिवसेनेचे भाऊसाहेब लटपटे यांनी पराभव केला. चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा या मोठ्या बाजारपेठेच्या ग्रामपंचायतीवर बाबूसेठ लोढा यांच्या पॅनलने विजय मिळवला. आमदार संदिप क्षीरसागर यांना धक्का.

बातम्या आणखी आहेत...