आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वत:सह मुलीवरही नराधमांनी बलात्कार केला. यानंतर न्यायालयीन लढा देत, आपल्या तक्रारीवर ठाम राहून चार बलात्काऱ्यांना जन्मठेपेपर्यंत पोहोचवणाऱ्या पीडितेविरोधातच बीड जिल्ह्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायतींनी चक्क गावबंदीचा ठराव केला आहे. इतकेच नाही तर ठरावात पीडित महिलेवर व्यभिचाराचेही आरोप करण्यात आलेत. आश्चर्य म्हणजे, ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचे हेे ठराव केले त्या तिन्ही गावांच्या सरपंच महिलाच आहेत.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव, वसंतनगर तांडा, जयराम नाईक तांडा अशी या तीन ग्रामपंचायतींची नावे आहेत. १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत हे ठराव करण्यात आले. गावकऱ्यांनी सोमवारी महिलेविरोधात पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या शाहिस्ता इम्तियाज या असून ठरावाच्या सूचक चांगुणा राठोड आहेत. जयराम नाईक तांडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसया देविदास पवार आहेत, तर या ठरावाच्या सूचक सुनीता सुभाष राठोड आहेत. वसंतनगर तांड्याच्या सरपंच संगीता संजय राठोड आहेत.
दरम्यान, बीडमध्ये राहणारी ३० वर्षांची पीडित महिला पाचेगाव येथे कापूस वेचणीसाठी गेली होती. १ जानेवारी २०१५ रोजी जीपचालक व तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२० रोजी न्यायालयाने चौघांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली होती. तिच्या अल्पवयीन मुलीवरही बीडमध्ये बलात्कार झाला होता. दरम्यान, पाण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर पीडितेच्या विरोधात गत आठवड्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे.
एसपी कार्यालयात आमने-सामने : पोलिस अधीक्षक कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता पाचेगाव ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आले होते. याच वेळी पीडिताही आपल्या मुलींसह तिथे पोहोचली. तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा उपअधीक्षकांसमोर मांडत आक्रोश केला. उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी तिची बाजू ऐकली, तर एसपींनी गावकऱ्यांची बाजू एेकली.
ग्रामस्थांनी लावले गंभीर आरोप
- ही महिला चारित्र्यहीन आहे
- गाव व परिसरातील नागरिकांना ती सतत धमकावते, खोट्या केसमध्ये अडकवते
- बलात्कार, विनयभंगाच्या तक्रारी देते
- महिलेपासून गावाला धोका असल्याने तिच्याबाबत निर्णय व्हायला हवा
माहिती घेऊन सांगतो
या प्रकरणाची माहिती माझ्यापर्यंत आली आहे, सखोल चौकशी करून मी आपल्याला असे ठराव घेतले गेले आहेत का आणि ते नियमात आहेत का, हे पाहून सांगतो. -अनिरुद्ध सानप, गटविकास अधिकारी, गेवराई
चौकशी सुरू आहे
महिलेवर अॅट्रॉसिटी दाखल आहे, पण अद्याप तिला अटक केलेली नाही. शिवाय, ग्रामस्थही आक्रमक आहेत. या प्रकरणात महिला, गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. - स्वप्निल राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी
पीडिता म्हणते, मला सततचा त्रास
- माझ्यावर अत्याचार झाला आहे
- माझ्यामुळे चार जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणून मला गावात राहू दिले जात नाही
- गावकरी मला त्रास देतात, माझ्यावर खोटी अॅट्राॅसिटी केली गेली
- मी गाव सोडावे यासाठी हे केले जात आहे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.