आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील ३० वर्षीय बलात्कार पीडितेला तीन ग्रामपंचायतींनी गावबंदी करत तसा ठराव घेतल्याची बाब सोमवारी समोर आली होती. याप्रकरणी बीडच्या अॅड. शार्दूल देशपांडे यांनी या प्रकरणाची थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली. दरम्यान, महिला आयोगानेही या तक्रारीची तत्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील ३० वर्षीय महिलेवर जानेवारी २०१५ मध्ये चार जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात ऑक्टोबर २०२० मध्ये चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी पाचेगावसह जयराम नाईक तांडा, वसंतनगर तांडा या ३ ग्रामपंचायतींनी पीडित महिलेच्या चारित्र्याबाबत आक्षेप घेत ती सतत गावकऱ्यांना धमकावते, खोट्या तक्रारी देते, त्रास देते असा आरोप करत महिलेला गावातून हद्दपार करण्याचा ठराव घेतला होता. सोमवारी (दि. २८) पाचेगाव ग्रामस्थ पोलिस अधीक्षक कार्यालयात महिलेविरोधात निवेदन देण्यासाठी आल्यानंतर ही बाब समोर आली. दरम्यान, महिलेनेही पोलिस अधीक्षक कार्यालयात येत आक्रोश केला होता. याप्रकरणी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी बीडचे माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. शार्दूल देशपांडे यांनी या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. हे प्रकरण गंभीर असून कारवाईची मागणी त्यांनी केली. महिला आयोगाने तातडीने याची दखल घेत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला आणि प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.