आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपत्तीत मदत:महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात 50 तास कार्यरत राहिलेल्या तरुणाच्या पाठीवर गावकऱ्यांची काैतुकाची थाप!

अमाेल मुळे | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किशोर लाेखंडेचा गावकऱ्यांकडून गौरव; वडील म्हणतात, ‘पोरानं नाव केलं’

रायगड जिल्ह्यातील महाड येथील पाचमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यात एकूण ५० तास पाेकलेन चालवून मदत करणारा, सलग २६ तास पाेकलेन चालवून एका चार वर्षीय मुलाला जिवंत बाहेर काढण्यात यशस्वी ठरलेला उखंडा (लिंबारुई) येथील तरुण किशोर भागवत लोखंडेचा रविवारी गावकऱ्यांनी सत्कार केला.

गेल्या आठवड्यातील या दुर्घटनेनंतर रायगड प्रशासनाने एनडीआरएफला पाचारण करून इथे मदतकार्य राबवले. दरम्यान, याच परिसरात एका खासगी कंपनीच्या पाेकलेन मशीनवर चालक म्हणून बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील किशोर लोखंडे हा युवक कार्यरत होता. प्रशासनाने मशीनसह किशोरला या बचावकार्यात बोलावले. किशोर म्हणतो, प्रत्येक वेळी मशीनच्या हँडलवर हात ठेवताना पोटात गोळा येत होता. कारण मातीखाली जिवंत माणूस असेल की मृतदेह हे सांगणं कठीण होतं. सलग २६ तास मी पाेकलेन चालवलं. यात १० मृतदेह बाहेर काढले. यानंतरही तीन दिवस ५० तास काम केले.

गावकऱ्यांकडून सत्कार, वडील झाले भावुक... डोळे पाणावले

किशोर रविवारी गावी उखंडा (लिंबारुई) येेथे आला होता. या वेळी त्यांचा गावकरी व लोकप्रतिनिधींनी सत्कार केला. किशोरचे वडील भागवत लोखंडे यांचे डोळे या वेळी पाणावले. पाेरानं नाव काढलं, अशी मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या वेळी जि.प. सदस्य प्रकाश कवठेकर, बेदरवाडीचे उपसरपंच ज्ञानदेव काशीद यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

...अन् कामाचा शीण गेला

सलग २६ तास काम करून खरं तर मी थकलो होतो. तोवर मी दहा मृतदेह बाहेर काढले होते. मृतदेहांनाही काही होऊ नये याची काळजी घेतली जात होती. पण एका चार वर्षीय मुलाला जिवंत बाहेर काढण्यात मला यश आलं आणि सगळ्या कामाचा ताण गेला, असे किशोर म्हणतो.

शासनाने दखल घ्यावी : बचावकार्यात ५० तास काम करणाऱ्या किशोरची शासनदरबारी दखल घेऊन त्याचा सन्मान व्हावा. किशोरचे कुटुंब भूमिहीन आहे. त्यांना आर्थिक मदत व्हावी.
- योगेश ठोसर, गावकरी, उखंडा.