आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणाला कलाटणी, ‘ती’ सुसाइड नोट बनावट : हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ती’ सुसाइड नोट बनावट

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने राज्यभर चर्चेत आलेल्या केतुरा (ता. बीड) येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला शनिवारी कलाटणी मिळाली. आत्महत्येनंतर सापडलेली सुसाइड नोट बनावट असल्याचे सिद्ध झाले. चिठ्ठीतील अक्षर विवेकचे नाही, असा अहवाल हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा दुरुपयोग करून केंद्र-राज्य शासनाविरुद्ध रोष व सामाजिक शांतता भंग करण्यासाठी खोडसाळपणे हा प्रकार केला गेला, असा ठपका ठेवत पोलिसांनी चिठ्ठी लिहिणाऱ्या व पसरवणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विवेक रहाडेने ३० सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याचे मामा नवनाथ वांढरे यांनी पोलिसांना दिली होती. अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर एक चिठ्ठी व्हायरल झाली. यात मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे आपला वैद्यकीय प्रवेशाला नंबर लागू शकत नाही, समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आपण आत्महत्या करत आहोत, अशा आशयाचा मजकूर होता.

उत्तरपत्रिकांवरून पडताळणी
कथित चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. विवेकचे शिक्षण झालेल्या साक्षाळपिंप्री व बीड येथील महाविद्यालयांतून त्याच्या जुन्या उत्तरपत्रिका हस्तगत केल्या. चिठ्ठी आणि उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे परीक्षणासाठी पाठवले. शुक्रवारी रात्री त्याचा अहवाल आला. यात चिठ्ठीतील हस्ताक्षर विवेकचे नाही, असे स्पष्ट केले गेले.