आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:‘माझा वाघ गेला; तरुणांनो, आत्महत्येचा मार्ग पत्करू नका, लढा द्या !’ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेक रहाडेच्या वडिलांची आर्त साद

बीड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नीटची परीक्षा दिली तेव्हापासूनच विवेक नाराज होता, दोन दिवस तो जेवलाही नाही. चुलत्यांना तो म्हणाला, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर माेठं नाव हाेईल असं काही तरी करेल; पण तो आत्महत्या करेल असं वाटलंच नाही. सरकारने आरक्षण प्रश्न निकाली काढून मराठा तरुणांचे प्राण वाचवावेत. आज माझा वाघ गेला.. मराठा तरुणांनो, आरक्षणासाठी आत्महत्येचा मार्ग पत्करू नका, आई बापाचा विचार करा’ अशी आर्त साद घातलीय ती मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेक रहाडेचे वडील कल्याण यांनी.

बीड तालुक्यातील केतुरा गावच्या विवेकने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र पेपर जरा अवघड गेला होता. विवेकचे कुटुंब शेतकरी असले तरी सुशिक्षित होते. त्याच्या मोठ्या चुलत बहिणीचा गतवर्षी आरक्षणातूनच संगमनेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएससाठी नंबर लागला होता. तर, त्याच्या आत्याची मुलेही डॉक्टर आहेत. त्यामुळे आपणही डॉक्टर व्हावं ही विवेकची इच्छा होती. कमी गुण मिळाले तर आता आपल्याला आरक्षणही नाही. त्यामुळे आपली वैद्यकीय प्रवेशाला निवड होईल का, ही चिंता त्याला होती.

कल्याण रहाडे म्हणातात, विवेक हा शालेय जीवनापासूनच हुशार होता. पाचवी ते नववी पर्यंत तो सैनिकी विद्यालयात होता. दहावीला ७२ तर नुकत्याच बारावीच्या परीक्षेत त्याला ७६ टक्के गुण मिळाले होते. विशेष प्राविण्यासह तो उत्तीर्ण झाला होता. शालेय स्तरावरही त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. बीडमध्ये तो खासगी शिकवणी वर्गाला होता. अभ्यासिकेतही जात होता. तो ज्या अभ्यासिकेत नीटच्या तयारीसाठी वाचनाला जात असे तिथे तो सर्वात लहान होता. इतर मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी होती. या मुलांच्या संपर्कातून आरक्षण, समाजाचे प्रश्न वगैरे त्याला कमी वयात कळाले होते. ही मुले विविध बैठकांना जात, आरक्षणाच्या मोर्चात त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहभाग नोंदवला. मुंबईच्या महामोर्चात गेले होते. हे सर्व विवेक पहात होता. आमच्या कुटुंबातून माझी पुतणी गतवर्षी आरक्षणामुळे बीएएमएसला लागली. विवेकलाही डाॅक्टर व्हायचे होते. पण कमी गुण मिळाले तर आरक्षणावर स्थगितीमुळे प्रवेश मिळेल का, ही चिंता होती. त्यातून त्याने हे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी त्याने मोठे चुलते अरुण यांच्याशी बोलताना समाजाला आरक्षण नाही मिळाले तर मोठं नाव होईल, असे काहीतरी करेल असे सांगितले. पण तो इतका टोकाचा निर्णय घेईल असे वाटले नाही.

राज्यभरात पडसाद
विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले. छत्रपती संभाजी राजे यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी रहाडे कुटुंबाची भेट घेतली. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनीही व आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारवर टीका केली.

आई-वडिलांचा विचार करा
मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. आरक्षणासाठी लढा देऊन यश मिळवावे. ज्या ज्या मार्गाने लढता येईल त्या सर्व मार्गाने लढा द्यावा. मात्र जीवन संपवू नये. आत्महत्येआधी कुटुंबाचाही विचार करावा.
- कल्याण रहाडे, मृत विवेकचे वडील

रात्री घेतली वही, पेन
विवेकचा लहान भाऊ दहावीत आहे. विवेकने मंगळवारी रात्री त्याच्याकडून रजिस्टर, पेन मागवून घेतला होता. त्याच रजिस्टरमध्ये त्याची चिठ्ठी होती. विवेकच्या अंत्यसंस्कारानंतर ती चिठ्ठी कुटुंबीयांना मिळून आल्याचे कल्याण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...