आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत वृक्षदिंडी; विविध स्पर्धांसह सायकल रॅलीचेही करण्यात आले आयोजन

बीड10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत शासकीय कार्यालयात तालुकास्तरावर वृक्षारोपण करण्यात येत आहे. ग्रामपंचायत नेकनूर येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, मेंगडे महाराज, पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख तसेच शालेय विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते. ममदापूर (ता.पाटोदा) येथे ग्रामपंचायत कार्यालय व वृक्षमित्र अभियान यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घराघरावर तिरंगा व दारात झाड’ ही संकल्पना घेऊन वृक्षदिंडी काढण्यात आली. शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येत आहे. शालेय, महाविद्यालय स्तरावरून निबंध, वक्तृत्त्व, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. केज तालुक्यातील शाळांमध्ये चित्रकला, निबंध अशा स्पर्धांसोबत विविध उपक्रमांचे आयोजन केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पाटोदा यांच्या वतीने पौष्टिक आहार पाककृती स्पर्धा घेण्यात आली.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कान्नापूर (ता. धारूर) येथेही स्पर्धा घेण्यात आल्या. शिरूर पंचायत समितीअंतर्गत अंगणवाडी केंद्रांवर लोगो पेंट करण्यात आलेत. शिरूर कासार व ग्रामीण भागात घरोघरी तिरंगा उपक्रमाची माहिती देणारे फलक लावले आहेत. शिवाय, जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके सुशोभीकरण केले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हा स्तरावरून मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडले जाणार आहेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी वारसास्थळी पदयात्रा काढण्यात येणार आहे. बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठांवर वृक्षारोपण केले जाणार आहे. नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान हाती घेण्यात येत आहे.

९ ऑगस्टला एकाच वेळी राष्ट्रगीत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ बरोबरच ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सव राबवण्यात येत आहे. यामध्ये ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शाळा, विद्यापीठे व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यामधून समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होतील. तसेच नागरिकांनीही या वेळी ते ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी उभे राहून राष्ट्रगीतासाठी थांबावे.