आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुष्काळ हटविण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटची गरज असते. पाण्याच्या दुष्काळात शेतकरी व सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडते. पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून पाण्याचे नियोजन हवे. सन २०३० नंतर देशात प्यायचे पाणी खूप महाग असेल.जमीनीचे रूपांतर वाळवंटात होत आहे. शेती हा भारतीयांचा प्रमुख उद्योग आहे. उत्पादन वाढले तरच आर्थिक सुबत्ता येईल, असे प्रतिपादन मानवलोक संस्थेचे कार्यवाह तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांनी केले. अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आधार माणुसकीचा या संस्थेचे संस्थापक ॲड.संतोष पवार, मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक सुभाष शिंदे, रवी मठपती, विवेकानंद कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी भागवत मसने, गणेश कदम, संमेलन प्रमुख वैशाली भुसा, शिवकन्या सोळंके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अनिकेत लोहिया म्हणाले, पाण्याचा अपव्यय टाळा. नदीची स्वच्छता ठेवायला हवी. नदी म्हणजे आई होय. नद्या वाहत्या राहायला हव्यात. नद्या वाहत्या राहण्यासाठी मानवलोक संस्था प्रयत्न करत आहे. नद्याचे पावित्र्य भंग करू नका. अलीकडच्या काळात पिण्याचे पाणी घाणीमुळे दुषित होत आहे.
पाण्यात कॅन्सरचे विषाणू अधिक असून ऐंशी टक्के आजार दुषित पाण्यामुळे होतात रसायनांचा शेतीत वापरा बंद करावा. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अबाधित ठेवावेत. लातूर, उस्मानाबाद व बीड तीन जिल्ह्यातील मांजरा नदीचा अभ्यास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. ॲड.संतोष पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे म्हणाले की, अभ्यासासोबतच विविध गुणदर्शन प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा.पालक आणि शिक्षक शिक्षणाचे दोन चाके आहेत.पालकांची शिक्षकांऐवढीच विद्यार्थी घडविण्यासाठीची जबाबदारी असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मसने, तिलोत्तमा इंगोले, बी.डी. खोडेवाड, थोरात यांनी केले. उपमुख्याध्यापक विलास गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास योगेश्वरी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात २०० विद्यार्थ्यांचा सहभाग सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी विविध गुणप्रदर्शन केले. लेझीम, देशभक्तीपर गीते, भारुड, एकपात्री नाटकाचा समावेश होता. माऊली माऊली गीत, लेझीमवरील डान्स, लावणी, ‘कष्टाचा रुपया’ नाटिका, बुरगुंडा भारुड (एकपात्री अभिनय), जोगवा गीत, तेरी मिट्टी मे मिल जावा या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.