आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडीच लाख उसनवारी करत टरबुजचे पीक घेतले. अवघ्या एक ते दोन दिवसांत ७० टनांवर टरबूज निघणार होते. व्यापाऱ्यासोबत त्याचा सौदाही झाला, पण गारपिटीच्या माऱ्याने होत्याचे नव्हते झाले. टरबूज विकून पुण्यात साई बालाजी इन्स्टिट्यूट येथे एमबीए शिकणाऱ्या मुलाची साडेचार लाखांची फीस भरायची होती. आता उसनवारी कशी फेडू आणि मुलाची फीस कुठून भरू? असा प्रश्न विचारत केज तालुक्यातील बोरगावचे (बु.) शेतकरी दत्तात्रय भागवत शिंदे यांनी धाय मोकलून रडत आपली व्यथा "दिव्य मराठी''समोर मांडली. दत्तात्रय शिंदे यांची गावालगत शाळेच्या पाठीमागे शेती आहे. शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये पत्नी, दोन मुली आणि एक मुलगी असे त्यांचे कुटुंब राहते. एका मुलीचा विवाह झालेला आहे. एक मुलगा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो तर दुसरा पुण्याला एमबीएचे शिक्षण घेत आहे.
१५ लाख रुपयांचे होणार होते उत्पन्न, पण गारपिटीने सर्व उद्ध्वस्त केले
दत्तात्रय यांनी खासगी पतसंस्थेचे व काही हातउसने पैसे घेऊन पाच लाखांची शेतीत गुंतवणूक केली. २ एकरवर टरबूज, दीड एकर क्षेत्रावर मिरची, १ एकर क्षेत्रावर काकडी तर वांगे आणि टोमॅटो प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर घेतले होते. दोन एकरवरील टरबूज हे ३ ते ५ किलो आकाराचे झाले होते. रविवारी व्यापारी हे टरबूज घेण्यासाठी येणार होते. ७० टनांवर टरबूज होणार आणि ७ ते ८ लाखांचे टरबूज व इतर पिकांचे मिळून १५ लाखांपर्यंत उत्पन्न होणार होते, पण गारपीटीने सर्व नुकसान झाले.
मिरच्या, काकडीही जमीनदोस्त
मिरच्या, काकडीही जमीनदोस्त गारांच्या माऱ्याने दीड एकर क्षेत्रावरील मिरची गळून जमीनदोस्त झाली. त्याचे ४ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. एकर क्षेत्रावरील काकडीची तोडणी सुरू असताना गारपीट झाल्याने वेलीला शिल्लक राहिलेली काकडी ही गारांनी झोपडल्याने त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर २० गुंठ्यावरील टोमॅटो आणि वांगे याची अशीच अवस्था झाल्याने त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
केजमध्ये १५ गावांत २ हजार शेतकऱ्यांना फटका
ऊस, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान गारपिटीमुळे केज तालुक्यातील १५ गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २ हजार १८० शेतकऱ्यांच्या १ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावरील ऊस, ज्वारी, गहू, भाजीपाला, फळबागांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ४९६ शेतकऱ्यांच्या ३८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.