आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशासनाची निष्क्रियता:सोनोग्राफी झालेल्या गर्भवतींचे काय? परळीत सुदाम मुंडेप्रकरणी पोलिस तपासात चालढकल

बीड / अमोल मुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपास अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सुदाम मुंडेवर गुन्हा नोंद झाला खरा; मात्र या प्रकरणाचा तपासाच्या गांभीर्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, मुंडेच्या सांगण्यावरून चार गर्भवती मातांची सोनोग्राफी झाली आहे. मात्र, या मातांचे पुढे काय झाले याची पडताळणी ना पोलिसांनी केली ना आरोग्य विभागाने केली आहे. सुदाम मुंडे हा गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपातात आरोपी आहे, त्याला शिक्षा झालेली आहे. अशा वेळी पुन्हा त्याच्या सांगण्यावरून चार गर्भवतींची सोनोग्राफी केली गेली. परळीत ही सोनोग्राफी झाली. छाप्यादरम्यान सापडलेल्या कागदपत्रांवरून हे समोर आले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी या सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी केली. एकुण मुंडे प्रकरणाचा तपास मात्र कासगवतीने होत आहे.

तपास अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
परळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम हे या प्रकरणात तपास अधिकारी आहेत. मुंडेच्या सांगण्यावरून सोनोग्राफी झाली होती का, त्या मातांचे पुढे काय झाले, याबाबत त्यांना विचारले असता अशी कुठली सोनोग्राफी झाली असल्याची माहिती पोलिसांकडे नाही, त्यामुळे गर्भवती मातांचे काय झाले याची पडताळणी करण्याचा प्रश्नच नाही, आरोग्य विभागानेही याबाबत काही सांगितलेले नाही, असे त्यांनी सांगितले. मुंडेकडचे साहित्य, मशीन कुठून आल्या याबाबतही अजून काही ठोस माहिती नाही. तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तपास अधिकारी माहिती देतील
या प्रकरणाचा मी आढावा घेतला तेव्हा मुंडेकडे मशीन कुठून आली, कशी खरेदी केली याबाबत माहिती काढली जात होती. काही पुुरवठादारांना जबाब घेण्यासाठी बोलावले होते. अधिकारी माहिती देतील. - स्वाती भोर, अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे उत्तर : माहिती घेण्यास सांगतो
सोनोग्राफी केलेल्या चार गर्भवती मातांचे पुढे काय झाले याबाबत परळीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. - डाॅ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
सुदाम मुंडे हा बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्याला रोखण्याची व कारवाई करण्याची पहिली जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची होती. मात्र वर्षभर टीएचओंच्या नाकावर टिच्चून तो रुग्णालय थाटून बसला होता. बुधवारी सायंकाळपर्यंत टीएचओ लक्ष्मण मोरे यांनी सोनोग्राफी केलेल्या चार मातांची चौकशी केलेली नव्हती. आरोग्य विभागाने किती गांभीर्याने सुदाम मुंडे प्रकरण घेतले आहे हे दाखवून दिले.