आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:मोबाइल तपासल्याच्या वादातून पत्नीला संपवले; दोन चिमुकलेही झालीत आता पोरकी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने मोबाइल तपासल्याच्या रागातून तिच्याशी झालेल्या वादातून पतीने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केला. नंतर मात्र स्वत:चे हातपाय दोरीने बांधून घेत शेजाऱ्यांना आवाज देऊन जागे केले अन् घरात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आपल्याला बांधून ठेवून पत्नीचा खून केल्याचा बनाव केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सखोल चौकशी करून काही तासांत ही बनवाबनवी समोर आणली. तालुक्यातील रंजेगावमध्ये रविवारी पहाटे हा प्रकार घडला. याप्रकरणी पतीविरोधात पिंपळनेर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला असून पतीला पोलिसांनी अटक केली.

ज्योती दिनेश ऊर्फ विश्वांभर आबूज (३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सिंदफणा चिंचोली (ता. गेवराई) माहेर असलेल्या ज्योती यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी रंजेगाव (ता.बीड) येथील दिनेश आबूज यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. दिनेश हा शेती करतो. मागील काही वर्षांपासून पती, पत्नीत काही ना काही कारणावरून वाद होत होते.

काही दिवसांपासून दिनेशचे आईवडील तीर्थयात्रेसाठी गेलेले आहेत. त्यामुळे, घरी दिनेश, ज्योती, दोन्ही मुले होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेशवर पत्नी ज्योती यांचा संशय होता. तो मोबाइलवर कुणाशीतरी सारखे बोलत असल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री जेवणानंतर दिनेशचा मोबाइल तपासला होता. न विचारता मोबाइल तपासल्याने दिनेशला राग आला आणि यातून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. दिनेशने ज्योतीला मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून तिचा खून केला.

आता मुलांची जबाबदारी आली आजी-आजोबांवर
ज्योती व दिनेश यांना एक आठ वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी आहे. खुनाची घटना घडली तेव्हा दोघे झोपेत होते. सकाळी आरडाओरडा ऐकल्यानंतर ते उठले तर आईचा मृत्यू झालेला होता. काही वेळात वडिलांनाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे दोन्ही मुले पोरकी झाली. दिनेश याच्या भावानेही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली होती. त्यामुळे आता या दोन्ही चिमुकल्यांची जबाबदारी वृद्ध आजी-आजोबांवर आली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरोड्याचा बनाव करून अशी केली दिशाभूल
आपल्या हातून पत्नी ज्योतीचा खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेशने यातून वाचण्यासाठी शक्कल लढवली आणि स्वत:चेच हात, दाेरीने बांधून घेत त्यात एक लाकडी दांडा टाकला. पहाटेच्या दरम्यान त्याने या दांड्याने गेट वाजवून शेजाऱ्यांना जागे केले. आमच्या घरी पाच चोर शिरले. त्यांनी मला बांधले व पत्नीचा खून केला अशी माहिती दिली. खुनानंतर पत्नीच्या अंगावरील कपडेही अस्ताव्यस्त केले होते.

श्वानाचा सिग्नल अन् पोलिसांचा संशय
दरम्यान, पोलिसांच्या पहाणीत घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली आढळून आली नाही. शिवाय, ज्योतीच्या अंगावरील दागिनेही शाबित होते. गावातही जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे, तिथेही कार्यक्रम सुरू होता. गावात इतर कुणीही चोर पाहिले नाहीत. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले नसल्याचे स्पष्ट झाले होते. श्वान पथकही पाचारण केले होते. श्वानही घरताच घुटमळून पुन्हा पुन्हा दिनेशच्या दिशेने येऊन थांबत होता. त्यामुळे, पोलिसंाचा दिनेशवर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...