आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जमा करून घेणार; डॉ. सुरेश साबळेंची माहिती

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीभ्रूण हत्येत आधीच बदनाम बीड जिल्ह्यात गर्भलिंगनिदान करून गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्भपातासाठी नवी एसओपी (मार्गदर्शक तत्त्वे) गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. १२ आठवड्यांपुढील गर्भपातासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी लागणार आहे, तर रेडिओलॉजिस्टकडे असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनही सरकारी रुग्णालयात जमा केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

रविवारी (५ जून) सीताबाई गाडे (रा. बकरवाडी) या महिलेचा गर्भपातादरम्यान अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाच्या चौकशीत गर्भलिंगनिदान करून नंतर गर्भपात करताना गर्भाशयाला इजा होऊन रक्तस्राव झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत गर्भलिंगनिदान करून अवैध गर्भपात केल्याचे समोर आले. यात डॉक्टरांनी गर्भलिंगनिदानासाठी एजंट म्हणून काम करणारी अंगणवाडी सेविका, महिलेचा पती, सासरा, भाऊ, एक लॅबचालक व परिचारिकेवर गुन्हा नोंदवला होता. गुन्हा नोंद होताच परिचारिकेने आत्महत्या केली होती, तर उर्वरित अटकेत होते.

दरम्यान, जिल्ह्यात गर्भपाताबाबत एसओपी तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या होत्या. गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांच्या अध्यक्षतेत पीसीपीएनडीटी समितीची बैठक घेतली. यात नवी एसओपी तयार केली. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व इतरांची उपस्थिती होती.

प्रभावी अंमलबजावणी करू
^जिल्ह्यात गर्भपातासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत तयार केली आहेत. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

गर्भवतींची करणार पडताळणी
जिल्ह्यात गर्भवती मातांची नोंदणी व नोंदणी झालेल्या मातांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी मोहिम राबवली जाणार आहे. यात ज्या गर्भवती मातांनी गर्भपात केलेले असतील त्यांची यादी तयार केली जाईल व त्यांनी कुठे व कधी गर्भपात केला याची चौकशी होईल. आशा, एएनएम, वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्यात. जनजागृतीही आरोग्य विभागाकडून सुरू आहे
-डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

डॉक्टर सापडेना, पोलिस पथकांकडून शोध सुरू
गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर ३ दिवसानंतरही पोलिसांना सापडला नाही. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याला अटक केलेली नव्हती. त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली असून लवकरच त्याला अटक करू असे डीवायएसपी संतोष वाळके यांनी सांगितले.

१२ आठवड्यांपुढील गर्भपातास सीएसकडून लेखी परवानगी हवी

रेडिओलॉजिस्टकडे असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जमा करणार.ज्या रुग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ नाही तिथे गर्भपात केंद्रास मान्यता नाही.मान्यता दिलेल्या गर्भपात केंद्रातही पूर्णवेळ तज्ज्ञ नसल्यास मान्यता रद्द होणार. पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट नसलेल्या केंद्रांचीही मान्यता रद्द केली जाणार.

बातम्या आणखी आहेत...