आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौन सोडले:पक्षाचे काम करत राहणार ; पंकजा मुंडे यांनी आष्टीच्या मेळाव्यात व्यक्त केले मत

आष्टीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने मला कोणतेही पद दिले नाही तरी मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे आणि या पुढेही करत राहणार. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी आष्टी येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपने डावलल्यांनतर पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते. दरम्यान, मंगळवारी आष्टी येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आष्टी येथे लक्ष्मी लॉन्सवर मंगळवारी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार, नगराध्यक्ष पल्लवी धोंडे, युवा नेते जयदत्त धस, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय धोंडे, रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरसेवक सुनील रेडेकर, दादासाहेब गर्जे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आज छोटेखानी बैठकीला आले होते. परंतु, या बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. हे पाहून मला भाजपची ताकद कळाली. आगामी निवडणुकीत मी स्वत: लक्ष घालणार असून प्रत्येक गटात माझी स्वत:ची कोअर कमिटी असणार आहे. जिल्हा परिषद ताब्यात आणण्यासाठी तुम्ही एकजुटीने तयार राहा, असे आवाहन पंकजा यांनी केले. सूत्रसंचालन माउली जरांगे यांनी केले.

तलवार म्यान; म्हणे, कार्यकर्त्यांना अडचणीत आणायचे नाही

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. माझ्यामुळे कुणी आमदार, खासदार, मंत्री झालेच, तर मला आनंदच आहे. तुम्हाला रस्त्यावर उतरवून पदे मिळवण्याएवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काहीही मिळवायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.