आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरकुलाच्या जागेच्या मागणीसाठी दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या वासनवाडी (ता. बीड) येथील अप्पाराव भुजा पवार या पारधी समाजातील व्यक्तीची पुतणी मनीषा विकास काळे (२३) यांची गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच प्रसूती झाली. सकाळी आठ वाजता पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पवार व काळे यांनी व्यवस्थेवरचा विश्वास उडाला असल्याचे सांगत सरकारी उपचार नाकारले.
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात अप्पाराव पवार राहतात. त्यांची पुतणी मनीषा विकास काळे याही पतीसह त्यांच्याच सोबत राहतात. अप्पाराव यांना घरकुल मंजूर आहे, मात्र ग्रामपंचायत घर बांधण्यासाठी जागा देत नसल्याने त्यांनी २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान मनीषा काळे या गर्भवती उपोषणकर्तीला प्रसववेदना सुरू झाल्या आणि त्यांची तिथेच प्रसूतीही झाली. सकाळी पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर ८ वाजता रुग्णवाहिका घेऊन शिवाजीनगर ठाण्याचे पीआय केतन राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले. त्यांनी पवार यांना बाळ व माता यांना रुग्णालयात पाठवा असे सांगितले, मात्र अप्पाराव पवार व मनीषा यांचा पती विकास काळे यांनी सरकारी उपचारांना नकार दिला.
ओली बाळंतीण आंदोलनस्थळी असलेल्या चबुतऱ्यावरच आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांना आंदोलनकर्ती महिला प्रसूत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी ७ वाजता ते रुग्णवाहिका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले. त्यांनी मनीषा यांना रुग्णालयात पाठवण्याची विनंती केली. मात्र, अप्पाराव पवार यांनी यासाठी नकार दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.