आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:महिला आणि बाल भवन उभारणार; नवजात अर्भक केंद्र उभारणीसाठी 14 कोटींची घोषणा

बीड6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आशा पल्लवित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राच्या समप्रमाणात राज्य शासनही देणार निधी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामासाठी ११ कोटी रुपये, अंबाजोगाईतील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीसाठी १४ कोटी २१ लाख रुपये, जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपये, परळी येथील प्रशासकीय इमारत बांधकामास २० कोटी रुपये आणि नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राच्या समप्रमाणात राज्य शासनाकडून निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

या अर्थसंकल्पात बीडच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला होता. संपूर्ण अर्थसंकल्पात राज्य शासनाच्या इतर सुविधा आणि विविध लोकपयोगी योजनांचा लाभ बीड जिल्ह्याला होणार आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राच्या समप्रमाणात राज्य शासनाकडून निधी दिला जाणार आहे. अमृत महोत्सवीनिमित्त जिल्ह्यात महिला व बाल भवन उभारणी केली जाईल. अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ११ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अंबाजोगाईत १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीची मागणी पूर्ण करत यासाठी १४ कोटी २१ लाख रुपये निधीही मंजूर केला. बीड येथे जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान बांधकामासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवासाठी ७५ कोटी : सप्टेंबर २०२२ मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामचा अमृत महोत्सव सुरू होत आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मुक्तिसंग्रामची माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता ७५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना
युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारची भरीव योजना जाहीर होणार आहे, बीड जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले होते त्यांचाही त्यात समावेश होईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव उभे राहणार आहे. या अर्थसंकल्पामुळे बीडकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून समाधान व्यक्त होत आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादन वाढीसाठीही निधीची तरतूद
राज्यासाठी कापूस आणि सोयाबीनसाठी एक हजार कोटी विशेष निधीची तरतूद केली आहे. मराठवाड्यात कापूस, सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली असून त्याचा लाभ जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांना मिळणार आहे.

भूविकास बँकेतील शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा बीड जिल्ह्यातील भूविकास बँकेअंतर्गत कर्जधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. यात जिल्ह्यातील ४०७३ शेतकऱ्यांचे समावेश असून त्यांचे १४.७६ कोटींची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील या बँकेमधील १९० कर्मचाऱ्यांचे वेतनासह इतर थकीत येणे रक्कम ९.७६ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारत कामाच्या आराखड्यास मंजुरी मिळणार
: अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आहे. बीड जिल्ह्याला या अर्थसंकल्पात भरीव तरतूद प्राप्त झाली आहे. ठळक बाबी जाहीर झालेल्या आहेत. तसेच इतर बाबींमध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारत बांधकामाचा आराखडादेखील मंजुरीसाठी पाठवलेला आहे. त्यासाठी लवकरच मंजुरी मिळणार आहे. तसेच संपूर्ण अर्थसंकल्पात इतरही सुविधा बीड जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...