आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 हजार 31 ग्रामपंचायतींना किट:जल सुरक्षकांसोबत महिला तपासणार पाणी गुणवत्ता

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जल सुरक्षकांसोबतच आता प्रत्येक गावातील पाच महिला पाण्याची गुणवत्ता तपासणार आहेत. यासाठी त्यांना पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून १ हजार ३६४ गावात हा उपक्रम राबवला जात आहे. यातील १ हजार ३१ ग्रामपंचायतींना तपासणी किटही उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली.

जिल्ह्यात १० हजार ९९५ पिण्याच्या पाण्याचे जल स्त्रोत असून हे सर्व स्त्रोत तपासण्याचे जबाबदारी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अंतर्गत येणाऱ्या पाच प्रयोगशाळांवर टाकण्यात आलेली होती. पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पाच प्रयोगशाळांमधून जैविक व रासायनिक तपासणी करून देण्यात येते. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात ही तपासणी मोहीम होत होती परंतु आता प्रत्येक तीन महिन्याला गावातच रासायनिक व जैविक तपासणीतील उपलब्ध झाल्यामुळे जलसुरक्षक व गावातील अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी व बचत गटातील सदस्य याप्रमाणे पाच महिला सर्व जलस्त्रोत तपासणी करणार आहेत.

जलस्त्रोत तपासणी केल्यानंतर त्यात दिलेल्या नमुन्याप्रमाणे तपासणी अहवाल गावातच सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे जलस्त्रोत जर बाधित आला तर त्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत ग्रामपंचायत नियोजन करणार आहे. प्रयोगशाळेला व पाणी गुणवत्ता अभियान कक्षाला देखील अहवाल उपलब्ध देण्याच्या सूचना प्रशिक्षणामधून देण्यात आलेल्या आहे प्रशिक्षण घेण्यासाठी संजय मिसाळ, भारत नागरगोजे, अमोल कुलकर्णी, संतोष वाघमारे, सय्यद सफदर अली गणेश खाडे यांनी परिश्रम घेतले आहे.

५ प्रशिक्षकांची निवड
पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावरून पाच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे प्रशिक्षक प्रत्येक तपासणी करण्याचे थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षणादरम्यान देत आहेत शिवाय पाणी तपासणी दरम्यान व नंतर काय काळजी घ्यावी अहवाल सहज उपलब्ध करण्याबाबतची माहिती देत आहेत. - चंद्रशेखर केकाण, प्रकल्प संचालक

या होणार तपासण्या
पाण्याचा पीएच, गढूळपणा, कठीणपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराइड, अल्कालीनीटी, क्लोरीन अवशेष, लोह, नायट्रेट आणि फ्लोराइडचे प्रमाण तपासले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...