आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:भोकरदन पाणीटंचाई निवारणार्थ 1 कोटी 22 लाखांचा कृती आराखडा; वाड्या वस्त्यांसाठी नियोजन

पिं.रेणुकाई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने जलस्त्रोतातील पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यासाठी येणाऱ्या काळात दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तसेच पाणी टंचाईला आवर घालण्यासाठी पंचायत समिती विभागाकडून तालुक्यातील १२४ ग्रामपचांयतीतर्गत ७१ गावे तसेच वाड्या वस्त्यासाठी १ कोटी २२ लाख २७ हजार रुपयांचा जानेवारी ते जून असा पुरवणी आराखडा जिल्हा प्रशानाकडे काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. त्याला देखील नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहीती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील दिशेने तालुका प्रशासनाला काम करावे लागणार आहे.

तालुक्यात २०१८-१९ वर्षीच्या पावसाळी हंगामात अत्यल्प पर्जन्यमान झाले होते. यामुळे हिवाळ्याच्या प्रारंभीच पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावागावात नागरिकांना पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागला होता. यात प्रशासनाची देखील मोठी धांदल उडाली होती. त्यातच धामणा व जुई प्रकल्पात मृतसाठा तर बाणेगाव धरणात बर्यापैकी पाणी असल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. प्रशासानाने जुई व धामणात चर खोंदुन तात्पुरती पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र मे अखेर प्रशासनाला विदर्भातुन पाणी आणुन पाणी टंचाई दुर करण्यासाठी प्रयत्न करावे लागले होते. जवळजवळ १८ वर्षातील सर्वात मोठी पाणी टंचाई भासणारे हे वर्ष तालुक्यातील नागरिकांना अतिशय अडचणीचे ठरले होते. ते न विसरता येणारे आहे. पंरतु मागील तीन वर्षापासून पावसाळी हंगामात तालुक्यात सरासरी पेक्षा चांगला पाऊस होत आहे. शिवाय परतीचा पाऊस देखील सप्टेंबर, आँक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावत असल्याने तालुक्यातील दुष्काळात नेहमी वरदान ठरत असलेले जुई, धामणा व बाणेगाव तसेच पाझर तलावात शंभर टक्के जलसाठा जमा होत आहे. विहिरीत व बोअर मधील पाण्यात चांगल्या प्रमाणात पाण्याची साठवण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या पेर्यात दुपटीने वाढ होत आहे. यंदा देखील जवळजवळ तालुक्यात ६५ हजार ३०० हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला होता.

त्यामुळे रात्री अन् दिवसा पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने अनेक भागातील विहिरीनी सध्या तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. तर तालुक्यातील बहुतांश गावातील विहिरीतील पाणी आटले असून वाढत्या तापमानामुळे धरणातील देखील पाणी झपाट्याने ऊतरु लागली आहे. सध्या दानापुर व शेलुद येथील धरणात जुन महिन्यापर्यंत पाणी पुरेल असा अंदाज पाटबंधारे खाते व्यक्त करीत असले तरी वाढते तापमान आणि धरणातुन होत असलेला अवैध पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी लवकरच उतरु शकते. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ १ कोटी २२ लाख २७ हजार रुपयाचा कृती आराखडा तालुका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान या आराखड्यात नवीन ईंधन विहीर, नळ योजना विशेष दुरूस्ती, तात्पूरती पुरक योजना, विहीर अधिग्रहण आदी कामांचा सहभाग आहे.

प्रशासनाने गाफील राहू नये
भोकरदन तालुक्यात दरवर्षी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना भयानक अशा पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागतात यंदा मुबलक पाणी असले तरी त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे धरणातील तसेच विहिरीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. यासाठी प्रशासनाने गाफील न राहता आतापासुन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सुभाष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य

आराखडा प्रशासनाकडे सादर
भोकरदन तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठी १ कोटी २२ लाख २७ हजार रुपयांचा पुरवणी आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. आता त्या दिशेने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. यातून कामे मार्गी लागेल.
-एम.एस.पाकळ, पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती

बातम्या आणखी आहेत...