आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जिल्हा क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी आपण राज्य सरकारकडून अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच हे जिल्हा क्रीडा संकुल विकसित होणार आहे. तसेच शहरातील आझाद मैदानाचाही लवकरच कायापालट केला जाईल. विविध खेळामधून गुणवान खेळाडू पुढे येण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत आमदार कैलास गाेरंटयाल यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर महात्मा जोतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था व राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ कबड्डी चषक स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य राजेश राठोड, प्रथम मंडल स्तंभ निर्माते डॉ. नारायणराव मुंढे, राष्ट्रीय कबड्डीपटू प्रा. सुरेश नवले, ॲड. विजय राख, भास्कर दानवे, जिल्हा क्रीडधिकारी अरविंद विद्यागर, आर. आर. खडके, भानुदास पालवे, मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंढे, शेख महेमूद, विजय कामड, सुदामराव सदाशिवे, राम सावंत, ॲड. राहुल हिवराळे आदींची उपस्थिती होती.
कबड्डी हा फुटबॉल, कुस्तीप्रमाणे मर्दानी खेळ आहे, जालना शहरात अनेक गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत, शहरात क्रीडामय वातावरण असल्याने आपण देशपातळीवरील कुस्ती व फुटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते. जालना शहरातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे आमदार गोरंटयाल यांनी सांगितले.
तर आमदार राजेश राठोड म्हणाले, कबड्डी हा खेळ ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा खेळ आहे. जालना जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी हे कबड्डी या क्रीडा प्रकारातूनच पोलिस म्हणून सेवेत रुजू झाले आहेत. चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून कबड्डीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न व्हावा, यासाठी सामुदायिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
भास्कर दानवे यांनी कबड्डी हा ग्रामीण भागातील व मातीतील खेळ समृद्ध व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर यांनी कबड्डीचा प्रचार व प्रसार होण्याची गरज विशद करून खेळाडूंनी आपल्या खेळातील कौशल्य दाखवावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंढे यांनी कबड्डी हा ग्रामीण भागातील खेळ आज मागे पडत चालला असल्याचे सांगून कबड्डीला पुढे घेऊन जाण्यासाठीच तसेच कबड्डीचा विकास करण्यासाठी जिजाऊ कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धा निरीक्षक विजय पाटोळे, स्पर्धा संघ प्रमुख प्रा. भुजंग डावकर, क्रीडा समन्वयक राजाभाऊ थोरात, पंजाबराव वाघ, संतोष नागवे आदींंचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा. लहुराव दुरगुडे यांनी तर डॉ. सर्जेराव गिऱ्हे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.