आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सुटका:मुकादमाने 11 मजुरांना दीड वर्ष ठेवले डांबून, आमदार गोरंट्याल यांनी पोलिसांना दिली माहिती

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांच्या धडक कारवाईने झाली सुटका

ऊसतोडीसाठी जालन्याहून सोलापूर जिल्ह्यात गेलेल्या एका कुटुंबातील ११ जणांना गुत्तेदाराने शेतातील कामासाठी दीड वर्षे बंधक बनवून ठेवले होते. यातील दोन महिलांनी आपली कशीतरी सुटका करून घेत जालना गाठले. त्यानंतर सर्व हकिगत आमदार कैलास गोरंट्याल यांना सांगितली. आमदार गोरंट्याल यांनी कदीम जालना पोलिस ठाण्याशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करुन उर्वरित ९ जणांची सुटका केली. सुटका केलेले हे सर्व मजूर शनिवारी जालन्यात आले.

जालना शहरातील सुवर्णकारनगर येथील मारिया बबलू घुले (४०) या आई, पती, बहीण, मेहुणा व घरातील सहा मुलांना घेऊन ऊसतोडीसाठी बाधलेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे दोन वर्षांपूर्वी गेल्या होत्या. ऊसतोड गुत्तेदार भरत अलदार (रा. बाधलेवाडी) यावर विश्वास ठेवून या कुटुंबीयांनी कामास सुरुवात केली. मात्र, गुत्तेदार अलदार व त्याचे सासरे डिगांबर माने यांनी ऊसतोडीनंतर सर्वांना परत न पाठवता आपल्या शेतात आणून ठेवले. तिथे त्यांच्याकडून काम करून घेऊ लागले. त्यांना जालन्याला परत जाण्यास विरोध करत बंधक बनवून ठेवले. दीड वर्षापासून हे सहा जण मुलांसह संशयित माने यांच्या शेतात राबवत होते. दरम्यान, मारिया घुले यांनी शेतातून कशाबशा निघाल्या. त्यांनी थेट जालना गाठत आमदार कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आमदार गोरंट्याल यांनी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याशी संपर्क करून कामगारांची तातडीने सुटका करून जालन्याला आणावे, अशी विनंती केली. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी कदीम ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक महाजन यांनी गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक सोनवळे, हेड कॉन्स्टेबल कांगणे, होमगार्ड शीला साळवे यांचे पथक तपासाकरिता बाधलेवाडीकडे रवाना केले. पथकाने संशयित डिगांबर माने यांच्या शेतातून तीन पुरुष, दोन महिला व चार मुलांची सुटका केली. या सर्वांना शनिवारी जालना येथे आणण्यात आले. या प्रकरणी संशयित माने व त्यांचा जावई अलदार याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, सहायक निरीक्षक सोनवळे, उपनिरीक्षक भागवत कदम, महिला होमगार्ड शीला साळवे आदींनी ही कारवाई केली.

पोलिसांची तत्परता
मारिया घुले यांनी माझ्याकडे येऊन सर्व प्रसंग सांगितला. त्यामुळे मी तातडीने एस. पी. देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कोणताही वेळ न दवडता या प्रकरणी तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पध्दतीने ही सर्व कार्यवाही केली. त्यामुळे या कुटुंबाची सुटका होऊ शकली. -कैलास गोरंट्याल,आमदार

शिताफीने शेतातून सुटका
१२ मे रोजी मारिया घुले यांनी आई व नऊ वर्षांच्या मुलास दवाखान्यात न्यायचे, असे सांगून माने याच्या शेतातून सुटका करून घेतली. त्यांनी जालना गाठले व आमदार गोरंट्याल यांना साकडे घातले. गोरंट्याल यांनी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांना फोन केला. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...