आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेन वर्षांत जातीय अत्याचाराचे ११६ गुन्हे, १५ पीडितांना २३ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य, गुन्हे सिद्धीचे प्रमाण फक्त ३ टक्केजातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सदस्यांना अर्थसाहाय्य देऊन पुनर्वसन करण्यासाठी शासनाची योजना आहे. दाेन वर्षांत जिल्ह्यात ११६ गुन्हे दाखल झालेले आहेत.
या जातीयतेच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना अर्थसाह्य मिळण्यासाठी विभाग स्तरावर एक कोटीची मागणी जिल्हास्तराहून केली आहे. गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे. दरम्यान, चालू वर्षात जातीय अत्याचारग्रस्तांच्या ६४ घटना घडल्या. तीन गुन्हे हेतुपुरस्सर, आकसबुद्धीने दाखल झालेले असल्याचे तपासात समोर आल्याने तसा अभिप्राय (रिमार्क) केल्याने त्या फिर्यादींना अनुदान मिळण्यास अडचणी येणार आहेत. चालू वर्षात १५ पीडितांना अर्थसाहाय्य मिळाले आहे.
जालना जिल्ह्यात जातीयतेतून अनेकदा गुन्हे दाखल होतात. परंतु, सर्वच गुन्हे वस्तुनिष्ठ नसतात. काही जण खोट्या तक्रारी करून अनेकांना फसवण्याचा प्रकार करतात, तर काही घटना सत्य परिस्थितीनुसारही घडतात. अशा जातीय अत्याचाराला बळी पडलेल्यांना शासनाकडून अर्थसाहाय्य देऊन पुनर्वसन करण्यासाठी शासनाने योजना केली आहे.
या योजनेतून अत्याचार पीडितांना अर्थसाह्य करून पुनर्वसन केले जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटुंबांवर, व्यक्तींवर अत्याचार घडल्यास या गु्न्ह्यांतील पीडितांना गुन्ह्यांच्या स्वरूपावरून ६० हजार ते ८ लाख २५ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते. यात गुन्हा दाखल झाल्यापासून ते पोलिसांनी चार्जशीट दाखल करणे, नंतर न्यायालयाकडून निकालापर्यंतच्या तीन टप्प्यांत अनुदान दिले जाते. दरम्यान, जालना जिल्ह्यात चालू वर्षात १५ पीडितांना २३ लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. काही दाखल गुन्हे पोलिसांच्या तपासात संशयास्पद असल्याने या फिर्यादींना अनुदान मिळणे अडचणीचे ठरणार आहे. पोलिसांच्या निष्पक्ष तपासामुळे अनेकांवर अन्याय होत नाही तर पीडितांना न्याय मिळण्यासही मदत होत आहे.
आठ प्रस्ताव पेन्शन केसचे
चालू वर्षातील पंधरा पीडितांना २३ लाख ७० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. तसेच काही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी गेलेली आहेत. या अर्थसाहाय्याचा पीडित कुटुंबीयांना लाभ मिळत आहे. यातून अनेक कुटुंबे पुन्हा नव्याने उभे राहत आहेत. यात आठ प्रस्ताव पेन्शन केसचे आहेत. या पीडित कुटुंबातील घरातील प्रमुखकर्त्यांवर अत्याचार झाल्याने या आठ जणांना ५ हजार रुपयांची पेन्शनही मिळण्याची तरतूद आहे.
या गुन्ह्यांनुसार असते अनुदान
शिवीगाळ, मारहाण, खाण्यास घाणेरडे पदार्थ देणे, बेकायदा जमीन बळकावणे, मतदानापासून अटकाव करणे, विनयभंग, बलात्कार, खून, सामाजिक बहिष्कार, दरोडा यासारख्या ४७ प्रकारच्या अपराधांमध्ये अर्थसाहाय्य दिले जाते. तीन टप्प्यांत फिर्यादींना अनुदान मिळत असते. यात एफआयआर झाल्यानंतर २५ टक्के, चार्जशीटनंतर २५ टक्के, न्यायालयाच्या निकालानंतर उर्वरित रक्कम मिळते. परंतु, बऱ्याच गुन्ह्यांत फिर्यादी फितूर होणे, आरोपी-फिर्यादींमध्ये समन्वय होणे, साक्षीदार फितूर होणे, या विविध कारणांमुळे गुन्हेसिद्धीचे प्रमाण अत्यल्प राहत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.