आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:विहिरींच्या पाणीपातळीत 1.18 मीटरची वाढ, रब्बीला फायदा

प्रताप गाढे |जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर महिन्यात विहिरींची पाणीपातळी मागील पाच वर्षांपासून सरासरी ४.१० मीटर आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यामध्ये तब्बल १.१८ मीटरची भर पडली. यामुळे रब्बीला बळ मिळणार आहे. याबरोबरच लघु तसेच मध्यम प्रकल्पही तुडुंब भरले आहेत. यातूनही मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवले जाणार आहे. तसेच जायकवाडीच्या डाव्या कालव्यामुळेही १ लाख ४१ हजार सिंचन क्षेत्रावरील रब्बीला हातभार लागला आहे.

पाच वर्षातील तुलनेत सप्टेंबर महिन्यात पाणीपातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशी स्थिती असताना यंदा रब्बी हंगामाबरेाबरच उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येपासून मुक्ती मिळणार आहे. दरम्यान, ज्वारी, गहू, हरभरा, कापूस, तूर, तेलबिया व इतर रब्बी हंगामी पिकांना पाण्याचा आधार देण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना पाणी घेण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्पावर कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील जलाशयावरील व लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी व नदी-नाल्यांचे पाणी विहिरीत घेतात. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये उभ्या हंगामी पिकांना प्रकल्पामधील उपलब्ध जलसाठ्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना हंगामी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी संबंधित शाखा कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून कालव्यावरील सिंचनासाठी नमुना ७, जलाशय उपसावरील सिंचनासाठी ७ अ व जलप्रदाय विहिरीवरील सिंचनासाठी ७ ब नमुन्यात करावेत.

मध्यम, लघु प्रकल्पातून पाणी
कल्याण मध्यम प्रकल्प, कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प, अप्पर दुधना, गल्हाटी, जुई धरण, जिवरेखा यातून शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. तसेच आन्वी, जामवाडी, दरेगाव, नेर, सारवाडी, डावरगाव, भातखेडा, कानडगाव, रोहिलागड, मार्डी, तळेगाव, कोनड, भारज, डोलखेडा, चिंचखेडा, बरांजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते तसेच ढोकसाळ, पांगरी, पाखरी, पिंपरखेडा, शिरपूर, दहा, वाई आदी लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...