आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे सुसाट / लहू गाढे:सात महिन्यांत 1403 दुचाकींची चोरी; शोध फक्त 483 वाहनांचा

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागातील विविध जिल्ह्यांत दुचाकी चोरीच्या घटनांत वाढा झाली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांतून १ हजार ४०३ दुचाकी चोरीस गेल्या. यात ४८३ दुचाकींचा शोध लागला. अजूनही ९२० दुचाकी हाती लागलेल्या नाहीत. औरंगाबाद शहर-जिल्ह्यातून ४४६ तर बीड जिल्ह्यातून २७३ दुचाकी चोरीस गेल्या.

विविध शहरांसह ग्रामीण भागांमध्येही सराईत वाहन चोरट्यांचा वावर आहे. यापूर्वी काही जिल्ह्यांतील पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणाऱ्या टोळ्यांना पकडले. पण यामुळे वाहन चोरट्यांचा पुरेसा बंदोबस्त अद्यापही झालेला नाही. पोलिसांचे नेटवर्क वाहन चोरट्यांपर्यंत अजूनही पुरते पोहोचू शकलेले नाहीत. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी अगोदर एखादे वाहन चोरतात आणि त्याच वाहनाचा वापर करून गंभीर गुन्हा करतात, असेही काही प्रकार उघडकीस आले आहेत. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहून हँडल लॉक तोडून दुचाकींची चोरी होत असूनही चोरटे पोलिसांना सापडत नाहीत.

पोलिसांकडून विविध ठिकाणी जनजागृती
दुचाकी चोरीस जाऊ नये म्हणून नागरिकांनी आडवे लॉक लावावे. जुनी दुचाकी खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, दुचाकींना आडवे लॉक लावावे, याबाबत व्हिडिओ करून जनजागृती केली जात आहे. काही गुन्हे उघड करून आरोपीही निष्पन्न केले.
- रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद ग्रामीण.

विविध जिल्ह्यांत कागदपत्रांविना दुचाकी विक्री करणारे सक्रिय
कमी किमतीत जुन्या दुचाकींची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. पोलिसांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. अनेकदा बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या दुचाकींची विक्री केली जाते. कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याने कागदपत्रांशिवायही खरेदी होते.

पुणे येथे चोऱ्या करणारे चोरटे पकडले
रेकॉर्डवरील चोरट्यांवर नजर आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे चोऱ्या करणारे चोरटे जालन्यात जेरबंद केले. त्या चोरट्यांना पुणे पोलिसांनी तेथील गुन्ह्यांसाठी चौकशीकामी ताब्यातही घेतले. काही ठराविक टोळ्यांकडून हे काम होत असल्याचा संशय आहे.
-डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...