आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा हवामान पोषक असल्याने चिकूचे उत्पादन वाढले आहे. यामुळे जालन्याच्या बाजारपेठेत दररोज १५० क्विंटल चिकू दाखल होत असून आठवड्याची आवक तब्बल ४५० क्विंटलवर गेली आहे. सध्या नागपूर, श्रीरामपूरसह पिशोरच्या चिकूचा सुगंध चांगलाच दरवळला आहे. यामुळे जूनपर्यंत जिल्ह्याच्या बाजारपेठेची गरज भागणार आहे. ठाेकमध्ये सरासरी २५ ते ३० रुपयांचा दर व्यापाऱ्यांना मिळत आहे.
सध्या चिकूच्या बागांसाठी वातावरण चांगले असल्याने गुणवत्तापूर्ण फळे बाजारात दाखल झाली आहेत. मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देश या भागातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून जालन्याची ओळख आहे. या ठिकाणाहून भाजीपाला, फळे तसेच किराणा यासह गरजेच्या वस्तूंची मोठी उलाढाल होते. भाजीपाल्याच्या बाबतीत वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू राहते. दरम्यान, सध्या जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी चिकूचा बाजार भरवला जातो. यात गुणवत्ता, फळांचा आकार यानुसार दर ठरवला जातो. मेहकर, वाटूर, देऊळगावराजा, राजूर या ठिकाणी हे चिकू मोठ्या प्रमाणात पाठवले जातात.
प्रक्रियेनंतर होते विक्री
सध्या बाजारात दाखल होणारे चिकू थेट शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे दाखल होतात. दोनशे ते तीनशे किमी अंतरावरून दाखल होणारा माल हा काही प्रमाणात कच्च्या स्वरूपात राहतो. ज्या ठिकाणी त्याची विक्री होणार तेथे त्यावर प्रक्रिया करून पिकवला जातो. यानंतर हे चिकू विक्रीसाठी बाजारात पाठवले जातात.
देऊळगावराजा, मेहकरहून मागणी
जालन्याच्या बाजारातून देऊळगावराजा, मेहकर यासह स्थानिकला राजूर, भोकरदन, वाटूर, अंबड आदी ठिकाणी चिकूची मागणी असल्याने माल पाठवला जातो. पिशोर, नागपूर, श्रीरामपूर, कोपरगाव आदी ठिकाणचे चिकू आपल्याकडे दाखल होतात. -हनीफ चौधरी, चौधरी फ्रूट कंपनी, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.