आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांची आरास:गणपती बाप्पांसमोर दीड हजारांवर पुस्तकांची केली आरास

महेश कुलकर्णी । जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करतानाच बाप्पांसमाेर दीड हजारांहून अधिक पुस्तकांची हरिओमनगरातील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांनी भव्य आरास केली आहे. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, कृष्ण, दासबोध, भारतीय संविधान, साने गुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल पुस्तकांसह लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रे, साधना आमटे यांचे ‘समिधा’ आदी पुस्तकांची मांडणी केली. ग्रंथ हेच गुरू आणि ग्रंथ हीच संपत्ती असा संदेश देण्यासाठी यंदा वेगळ्या पद्धतीने गणेशाेत्सव साजरा करण्याचा निर्णय सदाव्रते परिवाराने घेतला.

गणपती आरास सजावटीत साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकासह भारतीय संस्कृती, मंदिर प्रवेशाची भाषणे अशी २५ पुस्तके आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कविता, संन्यस्त खड्ग, बोधिवृक्ष अशी पुस्तके आहेत. स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, युवा चेतना, आदर्श शिक्षण ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. समर्थ रामदास स्वामी यांचे ‘दासबोध’, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेवांच्या अभंगांची पुस्तके आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, कवी बा.भ. बोरकर यांचा ‘आनंद भैरवी’ कवितासंग्रह, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा ‘धृपद’ हा कवितासंग्रह, मराठी बखर गद्य हे पुस्तक आहे.

साधना आमटे ‘समिधा’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी, लेखिका वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ अशी अनेक पुस्तके आहेत. गणपती सजावट आरास मांडणीत भारतीय संविधान ‘हे पुस्तक लक्ष वेधून घेते. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या बालकथेची पुस्तकेही मांडण्यात आली आहेत. साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. गणपती आरास सजावटीत ‘साधना’ दिवाळी अंकही मांडण्यात आले आहेत. आरास सजावटीत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेतात. शांता शेळके, इंदिरा संत, सरोजिनी बाबर, बहिणाबाई चौधरी यांची छायाचित्रेही दर्शनी भागात मांडण्यात आली आहेत. दरम्यान, पुस्तकांची आरास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

उत्सवातून वैचारिक परंपरा जोपासली जावी
गणेशोत्सव साजरा करताना वैचारिक परंपरा जोपासली जावी अशी अपेक्षा आहे. आम्ही धार्मिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, महिला अादी विविध विषयांवरील पुस्तके मांडली आहेत. दोन दिवसांपासून पुस्तकांची तयारी चाललेली होती. जवळपास दीड हजार पुस्तके यात आहेत. -आरती सदाव्रते, हरिओमनगर, जालना

बातम्या आणखी आहेत...