आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच महिलेने मोती तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने तलावात उडी मारताच तलावाच्या काठावर बसलेल्या दोन युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेचे प्राण वाचवले. त्यांचे हे धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे.
चंदनझीरा भागातील आकाश थोरात आणि विद्युत कॉलनी येथील अनिल शिंदे हे दोन युवक गुरुवारी दूपारी 1 वाजेच्या सुमारास मोती तलाव येथे गप्पा मारत बसले होते. त्या वेळी 35 ते 40 वर्षे वयाच्या एका महिलेने मोती तलावात उडी घेतली. हा प्रकार पाहून क्षणाचाही विलंब न लावता आकाश आणि अनिल या दोघांनी तलावात उडी घेतली. परंतू महिलेला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. तेथे मासे पकडत असलेल्या गायकवाड नावाच्या व्यक्तीने त्या महिलेला गळात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आकाश आणि अनिल त्या महिलेपर्यंत पोहचले. त्यावेळी त्यांनी त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर इतर लोकांच्या मदतीने या महिलेला पाण्याबाहेर काढण्यात आले. तोपर्यंत इथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या महिलेच्या 13 वर्षीय मुलावर जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे एका नातेवाईकाने या महिलेला सांगितले. आपल्या मुलाचे बरे-वाईट झाले असेल तर जगुन काय करणार याच विवंचनेतून महिलेचा संयम सुटला. त्यामुळे तिने तलावाकडे धाव घेत प्राणत्याग करण्याचा प्रयत्न केला असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान या महिलेच्या मुलावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अन् चेहऱ्यावर हास्य उमटले
मुलाच्या वियोगाच्या कल्पनेने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र आकाश आणि अनिल यांच्या धाडसामुळे ती वाचली. काही वेळातच तिचे नातेवाईक तिथे पोहचले. परंतू ही महिला वाचल्याने नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रु होते.
सीटी हिरो
आकाश थोरात आणि अनिल शिंदे हे दोन युवक गुरुवारी खऱ्या अर्थाने सीटी हिरो ठरले. त्या दोघांचे प्रसंगावधान आणि धाडसमुळेच या महिलेचे प्राण वाचू शकले. संकटाच्या काळात जिवावार उदार होत धावून जाण्याची या मुलांची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.