आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजावणार हक्क:उद्या ठरणार 254 गावांचे कारभारी; तीन लाख 51 हजार मतदार बजावणार हक्क

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५४ ग्रामपंचायतींची धुरा सांभाळण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी रविवारी ८३० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी ८३० कंट्रोल युनिट व १६६० बॅलट युनिट लागणार असून त्यादृष्टीने त्या-त्या तहसील कार्यालयाकडून तयारी करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींत एकूण ३ लाख ५१ हजार ७८८ मतदार आहेत. दरम्यान, शनिवारी सर्व मतदान यंत्रांसह केंद्रप्रमुख व सहकारी कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला जाणार आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी होऊन २ हजार २२३ जणांनी अर्ज मागे घेतल्यावर १७ सरपंच तर ३५३ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे सरपंच पदासाठी ७४९ तर सदस्यत्वासाठी ४ हजार ३२१ अशा एकूण ५ हजार ७० उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली त्या जागा वगळून १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर २० रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.

यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशावरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार मतमोजणीचे ठिकाण व वेळ निश्चित करतील व शेवटी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा आयोजित करून सरपंच-उपसरंपच निवडले जातील. अर्थात येणाऱ्या नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्ह्यातील २५४ ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळणार आहे.

शस्त्रे जमा करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे, अशा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांचे शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यात जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेले आहेत. यानुसार शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावे. निवडणूक निकालानंतर एक आठवड्याच्या आत संबंधितांचे शस्त्र परत करण्यात येणार आहे.

५०७० उमेदवार रिंगणात
ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी ४ हजार ३२१ तर सरपंच पदासाठी ७४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अंबड तालुक्यात ८५२, भोकरदन ५३३, घनसावंगी ७६३, जाफराबाद ९०९, जालना ६००, मंठा ५२९, परतूर ८८४ अशा एकूण पाच हजार ७० उमेदवारांचे भविष्य मतदारांच्या हाती आहे.

बातम्या आणखी आहेत...