आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य सर्वेक्षण:जालन्यातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील मुलीसह 26 जण ‘निगेटिव्ह’

जालना3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कारोनाबाधित महिला राहत असलेले दु:खीनगर सील केले असून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एका बंद रस्त्यावर बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी.  - Divya Marathi
कारोनाबाधित महिला राहत असलेले दु:खीनगर सील केले असून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एका बंद रस्त्यावर बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी. 
  • 18 अहवालांची प्रतीक्षा, प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी

जालना शहरातील दु:खीनगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मुलीसह अन्य २६ जणांचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आले आहेत. यामुळे दु:खीनगरसह रांजणीवासीयांना काहीसा दिलासा मिळाला अाहे. मात्र, यातील आणखी १८ जणांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे चिंता कायम आहे. दरम्यान, बाधित महिलेच्या संपर्कातील ६१ जणांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले अाहे. यात जिल्हा रुग्णालयातील उपचार करणाऱ्या १७ जणांचा समावेश आहे. दरम्यान, काेराेनाबाधित महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी िदली. कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ जणांचा शोध घेऊन त्यापैकी ४४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २६ अहवाल प्राप्त झाले असून अाणखी १८ अहवालांची प्रतीक्षा आहे.  ४४ जण विलगीकरण कक्षात तर १७ जणांना अलगीकरण कक्षात ठेवले आहे. दरम्यान, अलगीकरण कक्षातील सर्व जण जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी असून यात डॉक्टर, परिचारिका व कक्षसेवकांचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे नमुने अद्याप घेतले नसल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय चिंतेत अाहे. अाता १० एप्रिलला स्वॅब घेतले जाणार असल्याचे या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. तोपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, काही टॅब्लेटही दिल्या आहेत. 

कंटेन्टमेंट प्लॅननुसार दु:खीनगर सील

कंटेन्टमेंट प्लॅननुसार दु:खीनगर सील करण्यात आले असून जि. प. सीईओ नीमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली २० पथके मंगळवारपासून प्रत्येक कुटुंबीयांचे सर्वेक्षण करत आहेत. दरम्यान, या भागात येणारे २८ रस्ते सील केल्यामुळे नागरिकांनी नियमावलीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पीपीई किट नसल्याने कर्मचारी चिंतित

जिल्हा रुग्णालयात ३ एप्रिल रोजी दाखल झालेल्या महिलेवर प्रथम जनरल वाॅर्डात उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला कोरोना वाॅर्डात हलवण्यात आले.  ५ एप्रिलला स्वॅब पाठवल्यानंतर ६ रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सलग चार दिवस पीपीई किटशिवाय उपचार करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांचा  त्या बाधित महिलेशी थेट संपर्क आल्यामुळे त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना पीपीई किट दिल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती, शिवाय हे कर्मचारी रुग्ण सेवेतच राहिले असते. मात्र रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता अलगीकरण कक्षात दिवस काढावे लागत अाहेत.  

रुग्णालय प्रशासनाचा गाफीलपणा 

महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालय प्रशासनानेे तातडीने कपाटातून किट काढून उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र, आता कोरोना वाॅर्डात काम करणाऱ्यांनाच या पीपीई किट मिळतील, असा नियम आहे. इतर वाॅर्डातील कर्मचाऱ्यांना या किटची गरज नाही, असे सांिगतले जात आहे. प्रत्यक्षात  संशयित रुग्ण थेट कोरोना वाॅर्डात भरती न होता अगाेदर अपघात विभागात येतो. येथून तपासणी केल्यावरच त्याला कोरोना वाॅर्डात नेले जाते. शिवाय, स्वॅब पाठवल्यावर दुसऱ्या  दिवशी अहवाल मिळतो. यात साधारणत: दोन दिवस जातात. अहवाल निगेटिव्ह आला तर ठीक अन्यथा कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकताे. यामुळे प्रथमत: ज्या अपघात विभागात रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना पीपीई किट मिळालीच पाहिजे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  या आजारात लवकर लक्षणे दिसून येत नसल्यामुळे रुग्ण अपघात विभागानंतर जनरल वाॅर्डातसुद्धा राहतो.  लक्षणे दिसल्यावर त्याला कोरोना वॉर्डात हलवले जाते. सदर ६५ वर्षीय महिला अगोदर अपघात विभाग, जनरल वाॅर्ड व नंतर कोरोना वाॅर्डात भरती झाली हाेती. अर्थात सर्वच वार्डातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट मिळावी, असे कर्मचारी वारंवार सांगत आहेत. हा जीवघेणा आजार असूनही रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा अाराेप हाेत अाहे. 

पहिल्या दिवशी होकार, नंतर घूमजाव

कोराेनासह सर्वच वाॅर्डांसाठी पीपीई किट मिळावी यासाठी कर्मचारी आक्रमक झाल्याने सर्वांनाच किट मिळतील असे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी घुमजाव करत कोरोना वाॅर्डातच या किट मिळतील, असे म्हटल्यामुळे कर्मचाऱ्यांनी  लेखी द्या, अशी मागणी केली. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांची  सही आणा तरच मागणीचे निवेदन घेऊ, असा पवित्रा औषधी विभागाने घेतला आहे. कायद्याचा धाकही ते दाखवत असल्याचेही कर्मचारी सांगतात. 

साठ्याची माहिती देणे टाळले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या किती पीपीई किट, मास्कसह अन्य साहित्य आले हे औषधीसाठा विभागाकडून सांगण्यास नकार देत जिल्हा शल्यचिकित्सकांनाच विचारा असा सल्ला दिला जात आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक आवश्यक साहित्य आहे, असे सांगत असले तरी सर्व वाॅर्डातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट द्यायला तयार नाहीत. यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णालय प्रशासन यांच्यात धुसफूस सुरू झाल्याचे दिसते. 

कोरोना वाॅर्डासाठीच किट 

नियमानुसार कोरोना वाॅर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पीपीई किट, एन-९५ मास्क आदी साहित्य दिले जात आहे. अन्य ठिकाणी नाही. अपघात विभागातून रुग्ण येत असले तरी असे रुग्ण दररोज येतात. यामुळे कोरोनाचा रुग्ण आला हे  कसे ओळखायचे? मात्र, कोरोना वाॅर्डात संशयित रुग्णच भरती करतो म्हणून तेथे पीपीई किटसह अन्य साधने देतो. या किटचा तुटवडा असल्याने फक्त कोरोना वार्डातच देत आहोत, पुरवठा झाल्यावर इतरांना देऊ. डॉ. एम. के. राठाेड, जिल्हा शल्यचिकित्सक.

बातम्या आणखी आहेत...