आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील जुई धरण यावर्षी फुल्ल भरल्याने आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दोन्ही धरणातून काही शेतकरी आपल्या शेतीसाठी पाणी घेत असल्याच्या कारणामुळे धरणातील पाणी पातळी कमालीची खालावत आहे. प्रशासन वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून भोकरदन शहरासह तालुक्यातील इतर २० गावांना पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई धरण पावसाळ्यात भरून वाहत होते. आता मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जुई धरणामध्ये केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच जुई धरणातून मोठ्या प्रमाणात मोटारी टाकून पाणी चोरी देखील करण्यात येत आहे. ही पाणी चोरी तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातून जवळपास वीस गावांना पाणी पुरवठा होतो जवळजवळ या धरणातून भोकरदन शहराचा तालुक्यातील २० गावांची तहान भागवली जाते. दरम्यान चार वर्षांपूर्वी तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे जुई धरणात जेमतेम पाणी साठा होता.
परिणामी तालुक्यातील जनतेला भयानक अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाला रात्रीच्या दिवस करावा लागला होता. परंतु मागील तीन वर्षापासून सलग जोरदार पर्जन्यमान होत असल्याने नदी नाले विहिरी पाजर तलाव धरणे ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे पाणी परिस्थितीत समाधान दिसत आहे. यंदा मात्र, पहिल्यांदाच तापमानात प्रचंड वाढ होत आहे. तसेच जुई धरणातून होत असलेल्या विविध पाणी उपशामुळे या धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली होत आहे. परिस्थितीत जुईधरणात २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे पाझर तलाव कोरडे ठक झाले असून विहिरींनी देखील तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याने अनेक गावात नागरिकांना आता विहिरीवरून पाणी शेंदून आणावी लागत आहे.
धरणातील पाणी जून पर्यंत पुरेल असा विश्वास तालुका प्रशासनाला असला तरी चोरी बंद केल्याशिवाय हा विश्वास सार्थक ठरणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील दरवर्षी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते दरवर्षी धरणात मुबलक पाणी असल्यावर धरणातून दिवस ढवळ्या होत असलेल्या पाणी चोरीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक असल्यावर प्रशासन कारवाई करण्यास सामोरे येते हे चित्र दरवर्षीचेच आहे. यंदा मात्र प्रशासनाने वराती मागून घोडे न हकता प्रत्यक्ष कारवाई करून आतापासूनच धरणातील पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. सध्या जुई धरणात २६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे.
पाण्याचा अपव्यय टाळावा
भोकरदन तालुक्यातील दानपुरातील जुई धरणात सध्या २६ टक्के तर सेलूद येतील धामणात ३९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत दोन्ही धरणातील पाणीसाठा पुरेल असा अंदाज आहे पाणी चोरी होऊ नये म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेले आहे. - सचिन राठोड, उपअभियंता पाटबंधारे विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.