आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलाइन अर्ज:सरपंचपदाच्या 266 जागा, 925 इच्छुक ; आज शेवटच्या दिवशी भरा फलाइन अर्ज

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी तहसील कार्यालयांमध्ये भाऊगर्दी केली असून उमेदवारांना अर्ज भरताना गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र टेबल लावण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असलेली वेळ राज्य निवडणूक आयोगाने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवून देत ऑफलाइन अर्ज भरण्यासही मुभा दिली. यासंबंधीचे आदेश गुरुवारी प्रशासनाकडे धडकले. दरम्यान, ग्रा.पं. सदस्य पदासाठी जिल्ह्यात ३४१२ तर सरपंचपदासाठी ९२५ उमेदवारांनी आपापले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींत अंबड तालुक्यातील ४०, घनसावंगी तालुक्यातील ३४, जाफराबाद तालुक्यातील ५५,जालना तालुक्यातील २९, परतूर तालुक्यातील ४१, भोकरदन तालुक्यातील ३२ तर मंठा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २८ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

परंतु राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यासह सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. ऑफलाइनचे आदेश धडकताच तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली असून प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील परिसरात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. निवडणुका होत असलेल्या सर्वच तालुक्यांमध्ये हीच परिस्थिती होती. जालना तहसील कार्यालयाबाहेर तर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसही नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने शुक्रवारीही उमेदवारी अर्जांचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जाते आहे.

आता करता येईल आफलाइन अर्ज
इच्छुक उमेदवारांना पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच ऑफलाइन नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

अर्जही उपलब्ध करणार
तहसीलदारांनी नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी. वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये आरओ लॉगीनमधून भरून घेण्यात यावे. याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांची राहील, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...