आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यस्थामार्फत लाच स्वीकारून ती रक्कम थेट पतसंस्थेतील स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगितलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. सुहासिनी कळसकर असे सापळ्यात अडकलेल्या ग्रामसेविकेचे नाव असून पैठण तालुक्यातील सोनवाडी येथे कार्यरत आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. सापळ्याची माहिती मिळताच ग्रामसेविका फरार झाली आहे.
यातील तक्रादार यांनी ग्रामपंचायत सोनवाडी बु. च्या वतीने कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम केले होते. या कामाचे शिल्लक राहिलेले ६ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेविका सुहासिनी कळसकरने तक्रारदाराकडे बिलाच्या पाच टक्क्यांप्रमाणे ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २७ हजार रुपयांची मागणी ग्रामसेविकेकडून करण्यात आली. वॉचमन संदीप घाटविसावे याने ही रक्कम स्वीकारून त्याच पतसंस्थेतील रोखपालकडे दिली व ग्रामसेविका कळसकरच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्या वेळी लाच म्हणून दिलेली २७ हजार रुपयांची रक्कम रोखपालाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केली. सापळ्याची माहिती मिळताच ग्रामसेविका फरार झाली आहे.
ग्रामसेविकेच्या घराची झडती छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेविकेच्या पैठण येथील घराची झडती घेतली. त्याचा अहवाल शनिवारी उशिरापर्यंत आला नव्हता. दरम्यान, अटक केलेला वॉचमन संदीप घाटविसावे यास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.