आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १० ठिकाणी २७० युवक-युवती विविध प्रकारचे स्वयंरोजगारविषयक प्रशिक्षण घेत आहे. २२ मार्च २०२२ पासून सुरू झालेले हे प्रशिक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या युवक-युवतींना विविध कंपन्यांमध्ये रोजगार किंवा स्वत:चा उद्योग-व्यवसाय करता येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सकारात्मक फलित लक्षात घेऊन वर्ष २०२२-२३ साठी पुन्हा १२२५ युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याची तयारी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाने केली आहे.
सद्य:स्थितीत उद्योग-व्यवसायांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज व संधी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीमार्फत विविध अभ्यासक्रमांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण व १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींची निवड करून त्यांच्या आवडी व क्षमतानुसार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणात ७५ टक्के उपस्थिती आवश्यक
प्रशिक्षण कालावधीत किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक असल्यामुळे युवकांना प्रशिक्षण केंद्रावर नियमित उपस्थित राहणे आवश्यक आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडून मागवला जातो, जेणेकरून सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती समजेल व प्रशिक्षणाचे अपडेट्सही मिळेल.
हे आहेत अभ्यासक्रम : डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन (टू व्हीलर, थ्री व्हीलर), स्पीड फ्रेम ऑपरेटरल टेंटर अँड डॉफर, सेल्फ एम्प्लॉइड टेलर, अन आर्म्ड सिक्युरिटी गार्ड, सीएनसी ऑपरेटर, हॅँड सेट रिपेअर इंजिनिअर अशा प्रकारचे कोर्सेस असून जिल्ह्यात दहा ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे.
नवीन बॅचेससाठी करा संपर्क
चालू वर्षात जिल्ह्यातील जवळपास १२२५ युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण व १८ ते ४५ वयोगटातील युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा ०२४८२- २९९०३३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संपत चाटे (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता) यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.