आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:जिल्ह्यात वर्षभरात २८ बलात्कार; २३ घटनांत नात्यातीलच पुरुषांकडून अत्याचार

लहू गाढे | जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत तीन घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी घनसावंगी तालुक्यातील एका गतिमंद मुलीवर अत्याचार झाला, तर भोकरदन तालुक्यात दोन अत्याचाराच्या घटना समोर आल्या. दरम्यान, दहा महिन्यांतील २८ बलात्काराच्या घटना घडल्या. यात २३ घटनांत परिचित, नातेवाइकांकडूनच अत्याचार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ५० वर्षीय सर्वाधिक तर सर्वात कमी १४ वर्षीय वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. वीसवर्षीय वयोगटातील १२, तर पन्नाशीच्या आतील १६ महिलांवर अत्याचार झाले. २८ प्रकरणांत जवळपास ६० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

सोशल मीडियावरून जाळ्यात ओढणे, ओळखीचा फायदा घेऊन फसवणूक करणे, लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. १ जानेवारी ते २० नोव्हेंबर या कालावधीत अत्याचाराच्या २८ गुन्ह्यांची नोंद झाली. बहुतांश गुन्ह्यांत महिला, मुलींच्या नात्यातीलच आरोपी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अत्याचार, विनयभंग गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पिंक पथक नेमले आहे.

या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एपीआय निशा बनसोड, दिगंबर चौरे, लालझरे, अंमलदार मदन डोईफोडे, नाथा दिवटे हे या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना निष्पन्न करण्याचे काम करीत आहेत.

अत्याचाराच्या घटनेमुळे एकाची आत्महत्या, दिराचा भावजयीवर अत्याचार, आता गतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्ह्यातील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न
बलात्काराचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनोळखी व्यक्तींबाबत महिला, मुलींनी सजग राहावे. फसवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांशीही संपर्क साधावा. - डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

मुली, महिलांनी सजग राहण्याची गरज
वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुली, महिलांनी सजग राहण्याची गरज आहे. जवळचे असो किंवा अनोळखी कोणत्या नजरेने पाहतात, हेसुद्धा ओळखण्याची गरज आहे. आपल्या मित्र, मैत्रिणींची घरच्यांनाही माहिती सांगत राहावी. जेणेकरून कुठे फसवणूक होत असेल तर त्याबाबत काळजी घेता येते. - शुभांगी देशपांडे, जिल्हाध्यक्षा, भाजप सांस्कृतिक सेल, जालना.

बातम्या आणखी आहेत...