आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत शेतीचा मार्ग:सेंद्रिय फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापनेसाठी एकवटले ३०० शेतकरी‎

‎‎बाबासाहेब डोंगरे | जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी‎ विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती‎ योजनेच्या माध्यमातून भोकरदन तालुक्यातील‎ देऊळगाव ताड, चिंचोली, वालसा,‎ डावरगाव, केदारखेडा, वालसा - खालसा या‎ गावातील १५ शेतकरी गटांनी नोंदणी प्रस्ताव‎ आत्मा कार्यालयाकडे केली आहे, तर याच‎ शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून ३००‎ शेतकऱ्यांनी सुनील ऑर्गेनिक फार्मर्स‎ प्रोड्युसर कंपनी ही जिल्ह्यातील पहिली‎ सेंद्रिय शेती उत्पादक कंपनी स्थापन केली‎ आहे.

यातील सभासद शेतकऱ्यांना बदनापूर‎ येथील कृषी विज्ञान केंद्रात लागवडपूर्व व‎ पश्चात, उत्पादन व विक्री व्यवस्थापनाचे‎ प्रशिक्षण देऊन उत्पादक ते ग्राहक साखळी‎ निर्माण केली जाणार आहे.‎ अन्नधान्य आणि संकरित वाणाच्या तसेच‎ इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी‎ रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके‎ आणि तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात व‎ असंतुलित वापर, पाण्याचा जास्त वापर,‎ जमिनीची धूप होणे, सेंद्रिय खतांंचा कमी‎ वापर आदी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन‎ बिघडून जमिनीतील जैविक घटकाचा विनाश‎ झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असून‎ कडक बनत आहेत.

परिणामी जमिनीचा पोत‎ बिघडून जमिनी नापीक होणे अथवा पिकांची‎ उत्पादकता कमी होणे, उत्पादित शेतमालाची‎ प्रत खालावणे, मानव व पशुपक्षी यांच्या‎ आरोग्यावर विपरीत परिणाम होणे,‎ मशागतीचा खर्च वाढून रासायनिक‎ निविष्ठाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात‎ खर्च केल्यामुळे उत्पादन खर्च वाढत अाहे. या‎ सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रिय‎ शेतीस शासनाकडून प्रोत्साहन दिले जात‎ आहे.‎ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला लसूण दाखवताना‎ वालसा डावरगावचे शेतकरी भाऊसाहेब कऱ्हाळे.‎

सेंद्रिय फळे, भाजीपाल्याला चव चांगली‎ सेंद्रिय फळे, भाजीपाला व अन्नधान्याची चव चांगली असून‎ याला बाजारभावही अधिक मिळतो, आरोग्यासाठीही पोषक‎ आहे. यामुळे सहा गावातील ३०० शेतकऱ्यांनी एकत्र येत‎ सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला असून येत्या जून‎ महिन्यापासून या पद्धतीने पीक लागवड केली जाणार आहे,‎ असे वालसा-डावरगाव येथील सुनील ऑर्गेनिक फार्मर्स‎ प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष कैलास कऱ्हाळे यांनी सांगितले.‎

कंपनीमार्फत सेंद्रिय शेतीला बळ‎ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सेंद्रिय शेतीला‎ चालना दिली अाहे, तर संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष जागतिक‎ तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने जिल्ह्यात सेंद्रिय तृणधान्य‎ ग्राहकाला मिळवून दिले जाणार आहे.‎ - शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक, आत्मा, जालना‎

भोकरदन तालुक्यातील ६ गावांतील शेतकऱ्यांचा पुढाकार‎ शेतकऱ्यांना पहिल्या तीन‎ टप्प्यात देणार प्रशिक्षण‎ पहिल्या प्रशिक्षणात सेंद्रिय शेतीची‎ संकल्पना, उद्देश व कार्यपद्धती‎ सांगितली जाईल. आंतरपीक‎ लागवड, मूलस्थानी जलसंधारण,‎ सापळा पिके आदी बाबी शिकवल्या‎ जातील. द्वितीय प्रशिक्षणात पिक‎ नियाेजन, आंतरपीक लागवड,‎ सापळा पिके, बीज प्रक्रिया, किड व‎ रोग नियंत्रण, आदींचा समावेश‎ असेल. तृतीय प्रशिक्षणात पीक‎ वृद्धीवर्धके, तण नियंत्रण, सेंद्रिय‎ प्रमाणीकरण मानके, मालाची‎ प्रतवारी आदींचा समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...