आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाकडून मागील दोन वर्षांपासून अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती झाली नाही तसेच महसूल सहायकाची रिक्त पदे भरली नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपात सोमवारी ३०९ कर्मचारी सहभागी झाले. नववर्षाच्या प्रारंभीच महसूल कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे दिवसभरात तब्बल २ हजार फाइल्स कपाटबंद राहिल्या. शनिवार, रविवारच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी गजबजणारे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय, तहसील कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आठवडाभरापूर्वीच एकदिवसीय लाक्षणिक संप करत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन पाठवले होते. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २१ मार्च रोजी निदर्शने करत काळ्या फिती लावून काम केले होते तर २८ मार्च रोजी लाक्षणिक संप केला होता. तसेच शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रक्तदानही केले होते. या मागण्या मान्य न झाल्यास ४ एप्रिल रोजी बेमुदत संपाचा इशाराही दिला होता. यानुसार शासनाकडून मागण्यांची दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारी बेमुदत संप पुकारला. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच कामांना खीळ
१ एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहिल्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू झाले. मात्र दुसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी शनिवार तर ३ रोजी रविवारची शासकीय सुटी आली. यातच सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महसूल कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यामुळे विविध कामांना खीळ बसली. साधारणत: एक लिपिकवर्गीय कर्मचारी ९ फाइल्स काढतो किंवा त्यावर काम करतो. मात्र, संपामुळे या फाइल्स जागेवरच राहिल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी आदी वगळता महसूलचे कर्मचारी नसल्यामुळे कार्यालये ओस पडलेली दिसली.
संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांना पाठवला
नायब तहसीलदार, अव्वर कारकून, महसूल सहायक, वाहनचालक व शिपाई अशा एकूण ४३५ पदांपैकी ३५१ पदे भरलेली असून १५ कर्मचारी प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत. सोमवारी पूर्वपरवानगीने रजेवर गेलेले १० कर्मचारी होते तर संपात ३०९ जण सहभागी झाले होते. याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. या संपामुळे कार्यालयीन विविध कामे थांबली होती.
केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.