आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सांस्कृतिक सभागृहात बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राइव्ह जागेवर निवड संधी उपलब्ध करून देण्यात आली. या वेळी तीन खासगी कंपन्यांमध्ये रिक्त विविध ७५ पदांसाठी केवळ ३१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तर यातून केवळ २३ जणांची प्राथमिक निवड झाली. यामुळे नोकरीच्या पुरेशा संधी असल्या तरी कौशल्याअभावी युवकांना बेरोजगार राहावे लागत असल्याचे या वेळी दिसून आले.
नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापनाकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले होते.
यासाठी भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि. जालना यांची दहावी/बारावी/ पदवीधर उत्तीर्ण करिता मशीन ऑपरेटर १५ पदे, एमबीएसाठी एच. आर एक्झिक्युटिव्ह २ पदे, डिप्लोमा इंजिनिअर सिव्हिल / पदवीधर (B.E/B.tech) सिव्हिल इंजिनिअरसाठी ३ पदे, डिप्लोमा इंजिनिअर मेकॅनिकल पदवीधर (B.E/B.tech) मेकॅनिकल इंजिनिअरसाठी १५ पदे आणि ज्ञानेश्वरी सेक्युरिटी सर्व्हिस यांची दहावी/ बारावीसाठी सुरक्षा रक्षक (पुरुष/स्त्री) १५ पदे, बाऊन्सरसाठी ५ पदे, माजी सैनिकसाठी ५ पदे, सुपरवायझरसाठी ४ पदे अशी एकूण ६४ रिक्त पदे प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि., ज्ञानेश्वरी सेक्युरिटी सर्व्हिसेस व फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रा. लि. जालना या तिन्ही कंपन्यांमध्ये एकूण ७५ जागा होत्या. मात्र, इच्छुक व पात्र उमेदवार न आल्यामुळे एक तृतीयांश उमेदवारांचीच निवड होऊ शकली.
परीक्षा, सणांमुळे अल्प प्रतिसाद
प्लेसमेंट ड्राइव्हबाबत भरपूर प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली होती. महाविद्यालयांनाही पत्र पाठवले होते. मात्र कमीच प्रतिसाद मिळाला. सध्या परीक्षेचा कालावधी व दोन दिवसांपूर्वी होळी-धूलिवंदन सण झाल्यामुळे उमेदवारांची संख्या कमी राहिली असावी. प्रत्येक महिन्याचा दुसरा बुधवार ठरलेला असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नोकरीविषयक संधी व अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswaya m.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. -संपत चाटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.