आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंतेत:भोकरदन तालुक्यात कृषिपंपांची 333 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी

भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. भोकरदन तालुक्यात २६ हजार ७०० कृषिपंपांचे ग्राहक असून ३३३ कोटी ३६ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या धडक कारवाईमुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

भोकरदन तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचा कृषीपंपचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांनी चालु वीजबील जवळपास ७९ लाख ५९ हजार रुपये भरल्याची माहीती महावितरणचे लिपिक रविंद्र राठोड यांनी दिव्यमराठीला दिली. भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. वीजबिल थकीत असलेल्या कृषिपंप कनेक्शनधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावरून महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावल्याचे बोलल्या जात आहे.

त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. सुरुवातीला कापुस, मका, सोयाबीनवर अज्ञात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मका पीक काढताना शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तसेच कपाशीवर बोंडसळ व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पाहीजे तसे उत्पन्न झाले नाही. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांंच्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले.

त्यानंतर नुकसानीचे पंचनामे होवुन दिड महिने झाली, तरीही अजुनही शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत मिळाली नाही. अशा आर्थिक संकटात शेतकरी असताना मोठ्या हिमतीने पुन्हा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. सध्या पिके शेतात बहरली असताना विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरण कंपनीच्या वतीने जोपर्यंत चालु वीजबील शेतकरी भरत तोपर्यंत खंडीत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा दम शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे वीजबील भरण्यासाठी कुठून पैसे आणावे, प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अडचण
पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पिकांची पेरणी केली. सध्या पिके जोमात आली असुन विजेअभावी पाणी देता येत नसल्याने उत्पादनात घट होणार आहे. आता उसनवारी करुन ५ हजार रुपये वीजबील भरुन वीजपुरवठा चालु केला आहे. तरीही पाहिजे तसा वीजपुरवठा सुरळीत चालत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याचे शेतकरी राजू ढोके म्हणाले.

चालू बिल भरावे
वीजबिल थकीत असलेल्या वीज जोडणीधारकांचा विद्युत पुरवठा वरिष्ठांच्या आदेशानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. शेतकऱ्यांनी चालु वर्षाचे कृषीपंपाचे वीजबील भरावेत. तसेच खंडीत झालेला वीजपुरवठा चालु करुन घ्यावा आणि महावितरणला सहकार्य करावे. -- दीपक तुरे पाटील, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, भोकरदन

बातम्या आणखी आहेत...